‘बेस्ट’ला बळकटी देण्याचा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या देणीबाबत महापौरांचा दिलासा

मुंबई महानगरपालिकेची ‘बेस्ट’ उपक्रमाला बळकटी देण्याची भूमिका; कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देणी आणि बसेस वाढवण्याबाबत महापौर रितू तावडे यांचे आश्वासन.

Apr 4, 2026 - 03:07
Apr 5, 2026 - 03:26
 0  10
‘बेस्ट’ला बळकटी देण्याचा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या देणीबाबत महापौरांचा दिलासा
महापौर श्रीमती रितू तावडे

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका ‘बेस्ट’ उपक्रमाला बळकटी देण्याच्या दिशेने ठोस पावले उचलणार असल्याचे महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्पष्ट केले. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित संयुक्त सभेत त्यांनी हे प्रतिपादन केले.

महापौर श्रीमती तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये उपदान (Gratuity), वेतन करार, पदोन्नती, अनुकंपा तत्वावरील भरती, तसेच बेस्टच्या स्वतःच्या बसेसची उपलब्धता आणि आर्थिक सहाय्य या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता.

महापौरांनी सांगितले की, बेस्ट आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवणे ही महानगरपालिकेची प्राथमिकता आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान आणि इतर कायदेशीर देणी वेळेत देण्याबाबत प्रशासन संवेदनशील आहे. तसेच, बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बसेसचा ताफा वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल.

त्या पुढे म्हणाल्या की, बेस्ट ही मुंबईतील प्रमुख सार्वजनिक वाहतूक व वीज पुरवठा संस्था असून देशातील सर्वात मोठ्या नागरी परिवहन सेवांपैकी एक आहे. त्यामुळे या उपक्रमाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आर्थिक शिस्त, उत्पन्नवाढ आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी आवश्यक आहे.

या बैठकीत कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या आणि त्या सोडवण्याबाबत आश्वासन देण्यात आले. तसेच बेस्ट प्रशासनाने दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना आखून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देशही देण्यात आले.

या प्रसंगी उपमहापौर संजय घाडी, सभागृहनेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0