वैज्ञानिक युगात आध्यात्मिक गुरूंनी ‘ओरा’ तपासून पारदर्शकता ठेवावी : शिवकृपानंद स्वामी
शेगाव येथे झालेल्या ध्यान शिबिरानंतर शिवकृपानंद स्वामी यांनी भोंदूगिरी रोखण्यासाठी आध्यात्मिक गुरूंनी ‘ओरा’ तपासून जनतेसमोर पारदर्शकता ठेवावी, असे आवाहन केले.
शेगाव : सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे असून, या युगात आध्यात्मिक गुरूंनीही पारदर्शकता स्वीकारणे अत्यावश्यक आहे, असे मत शिवकृपानंद स्वामी यांनी व्यक्त केले. भोंदूगिरी रोखण्यासाठी आध्यात्मिक गुरूंनी स्वतःहून पुढाकार घेत आपला ‘ओरा’ (आभामंडळ) वैज्ञानिक पद्धतीने तपासून तो जनतेसमोर जाहीर करावा, असे त्यांनी आवाहन केले.
३ मार्च रोजी संध्याकाळी आनंद विहार येथे मुक्कामादरम्यान महेंद्र मिश्रा, अमोल सराफ आणि नानाराव पाटील या पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे मत मांडले.
महाराष्ट्रात सध्या कथित भोंदू बाबा अशोक खरात यांचे प्रकरण चर्चेत असून, या प्रकरणात अनेक राजकीय व सामाजिक व्यक्तींची नावे समोर येत आहेत. तसेच अनेक भाविकांची फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे खरा आणि खोटा गुरु ओळखण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर शेगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या तीन दिवसीय भव्य ध्यान शिबिरानंतर घेतलेल्या मुलाखतीत स्वामीजींनी सांगितले की, आजच्या वैज्ञानिक युगात अध्यात्माचे सोंग घेणे सोपे राहिलेले नाही. अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने व्यक्तीची मानसिकता, शारीरिक व मानसिक शुद्धता तसेच आभामंडळाची स्थिती तपासता येऊ शकते.
ते पुढे म्हणाले की, अशा सुविधा उपलब्ध असताना प्रत्येक आध्यात्मिक गुरु आणि संस्थानिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपला ‘ओरा’ तपासावा आणि तो जनतेसमोर पारदर्शकपणे मांडावा. यामुळे श्रद्धाळू भाविकांची फसवणूक टाळता येईल आणि समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण होईल.
दरम्यान, या आध्यात्मिक शिबिराला जर्मनीहून आलेल्या एका महिला साधकानेही आपले मत व्यक्त करत, भारतातील ध्यान परंपरा आणि आध्यात्मिक शिस्तीचे कौतुक केले.
— महेंद्र मिश्रा, बुलढाणा
What's Your Reaction?
Like
11
Dislike
0
Love
5
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
2