म्हाडा नाशिक मंडळाची ७४४ सदनिकांसाठी सोडत जाहीर; ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात

म्हाडा नाशिक मंडळाने ७४४ सदनिका आणि भुसावळमधील २ भूखंडांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत जाहीर केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्जदारांनी अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Jul 24, 2026 - 22:04
 0  9
म्हाडा नाशिक मंडळाची ७४४ सदनिकांसाठी सोडत जाहीर; ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात
MHADA Nashik Lottery 2026, म्हाडा सोडत

मुंबई | ब्युरो: अनिल सावरे 

नाशिकमध्ये घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने ७४४ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत जाहीर केली असून ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. याशिवाय जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे दोन भूखंडही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

नाशिक मंडळाच्या कार्यालयात आयोजित 'गो-लाईव्ह' कार्यक्रमात मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे, उपमुख्य अधिकारी प्रवीण बागूल, मिळकत व्यवस्थापक नितीन कुलथे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

या भागांमध्ये उपलब्ध सदनिका

सोडतीअंतर्गत पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, मखमलाबाद शिवार, चुंचाळे शिवार, आडगाव शिवार, सातपूर शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, तपोवन लिंक रोड, सामनगाव रोड, आगर टाकळी शिवार, गंगापूर शिवार, सिन्नर फाटा, देवळाली शिवार, चेहडी, मेरी-रासबिहारी लिंक रोड आणि वडाळा शिवार या परिसरातील गृहप्रकल्पांमध्ये सदनिका उपलब्ध आहेत.

४१२ सदनिका २० टक्के सर्वसमावेशक योजनेत, ३३२ म्हाडा योजनेत

एकूण ७४४ सदनिकांपैकी ४१२ सदनिका २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत, तर ३३२ सदनिका म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करण्याचे आवाहन

सभापती रंजन ठाकरे यांनी अर्जदारांना केवळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळ आणि MHADA Lottery App वरूनच अर्ज करण्याचे आवाहन केले. सदनिकांच्या वितरणासाठी कोणताही एजंट, प्रतिनिधी किंवा सल्लागार नियुक्त करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी आर्थिक व्यवहार केल्यास त्यास म्हाडा जबाबदार राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

तसेच IHLMS 2.0 ही संगणकीय सोडत प्रणाली पूर्णपणे ऑनलाइन, पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

माहिती पुस्तिका वाचूनच अर्ज करा

मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी अर्जदारांना अर्ज करण्यापूर्वी माहिती पुस्तिकेचा सविस्तर अभ्यास करण्याचे आवाहन केले. या पुस्तिकेमध्ये अर्ज प्रक्रिया, पात्रता, नियमावली, मार्गदर्शक सूचना आणि सदनिकांचा संपूर्ण तपशील उपलब्ध असून ती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या तारखा

२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना

ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत : २८ जुलै २०२६, रात्री ११:५९

ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची अंतिम वेळ : २८ जुलै २०२६

RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम : २९ जुलै २०२६ (बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत)

स्वीकृत अर्जांची अंतिम यादी : ११ ऑगस्ट २०२६, सायंकाळी ६:००

म्हाडा गृहनिर्माण योजना

ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत : २० ऑगस्ट २०२६, रात्री ११:५९

ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची अंतिम वेळ : २० ऑगस्ट २०२६

RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम : २१ ऑगस्ट २०२६ (बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत)

स्वीकृत अर्जांची अंतिम यादी : ४ सप्टेंबर २०२६, सायंकाळी ६:००

म्हाडाने स्पष्ट केले आहे की सोडतीची तारीख व स्थळ स्वतंत्रपणे अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

अर्जदारांसाठी महत्त्वाचे आवाहन

म्हाडाने नागरिकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करत, केवळ अधिकृत संकेतस्थळ आणि MHADA Lottery App चाच वापर करावा, तसेच कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थावर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट केले आहे. पारदर्शक आणि संगणकीकृत सोडत प्रक्रियेमुळे पात्र अर्जदारांना न्याय्य पद्धतीने सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0