डॉ. उदय सामंत यांचे निर्देश: विखरन सौर प्रकल्पाची उर्वरित जमीन लवकरच ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरित

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथे उभारण्यात येत असलेल्या 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी उर्वरित क्षेत्र ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश डॉ. उदय सामंत यांनी दिले. या बैठकीस जयकुमार रावल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Apr 9, 2026 - 22:01
Apr 9, 2026 - 22:12
 0  1
डॉ. उदय सामंत यांचे निर्देश: विखरन सौर प्रकल्पाची उर्वरित जमीन लवकरच ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरित
डॉ. उदय सामंत

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथे उभारण्यात येत असलेल्या 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी उर्वरित क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला गती देण्याचे निर्देश उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

उद्योग मंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस पणन व रोजगार हमी मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु, सहमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, महाजनकोचे अधिकारी तसेच संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत सुमारे 1350 एकर एकूण क्षेत्रांपैकी अंदाजे 400 ते 500 एकर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको) च्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावातील तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश डॉ. सामंत यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमार्फत मौजे मेथी व विखरन (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे 250 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी एकूण 540.05 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यामध्ये खाजगी वाटाघाटीद्वारे 476.06 हेक्टर, भूसंपादन अधिनियमांतर्गत 28.66 हेक्टर तसेच 34.91 हेक्टर शासकीय जमिनीचा समावेश आहे.

यापूर्वी सुमारे 900 एकर जमीन सौर प्रकल्पासाठी देण्यात आली असून, उर्वरित सुमारे 400 एकर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेऊन अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री डॉ. सामंत यांनी दिली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0