मुख्यमंत्री ग्राम सडक व हॅम योजनेतील रस्त्यांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करा – मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि हॅम योजनेंतर्गत सुरू असलेली कागल, गडहिंग्लज व उत्तूर परिसरातील रस्त्यांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. विविध रस्ते, जमीन, प्रॉपर्टी कार्ड, अतिक्रमण नियमितकरण आणि क्रीडांगणाच्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला.
प्रतिनिधी : उमेश जाधव
कागल, गडहिंग्लज व उत्तूर परिसरातील रस्ते आणि विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा
कोल्हापूर, दि. २३ : जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत कागल, गडहिंग्लज व उत्तूर परिसरात तसेच हॅम योजनेंतर्गत कागल तालुक्यात सुरू असलेली रस्त्यांची कामे येत्या जानेवारी अखेर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
कागल, उत्तूर आणि गडहिंग्लज परिसरातील रस्ते तसेच अन्य स्थानिक प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध आढावा बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये रस्ते कामांची प्रगती, नागरिकांच्या प्रलंबित समस्या, जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील प्रश्न आणि विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि हॅम योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेताना मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. रस्ते कामांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये आणि नागरिकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रशासनाने आवश्यक समन्वय साधावा, असे त्यांनी सांगितले.
कागलमधील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सोडविण्याचे आवाहन
कागल येथील रि.स. नंबर ४२६ मधील रहिवाशांच्या प्रॉपर्टी कार्डसंदर्भातील प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. या प्रकरणात प्रशासनाने समन्वय साधून मानवी दृष्टिकोनातून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
स्थानिक रहिवाशांनी रि.स. नंबर ४२६ मधील ४२ गुंठे धारकांना वगळून उर्वरित जागेचा स्वतंत्र ७/१२ उतारा तयार करावा तसेच जमीन वर्ग-१ करण्यात यावी, अशी मागणी केली. या मागणीवर जिल्हा प्रशासनाने योग्य अभ्यास करून प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका दर्शविली.
सिद्धनेर्लीतील वाढीव गावठाण प्रस्तावाचा आढावा
२०११ पूर्वीच्या शासकीय जागेवरील अतिक्रमित बांधकामे नियमित करण्याच्या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत सिद्धनेर्ली येथील वाढीव गावठाण आणि गायरान लाभार्थ्यांच्या प्रस्तावाबाबतही आढावा घेण्यात आला. संबंधित प्रस्तावांवर नियमानुसार कार्यवाही करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा झाली.
गडहिंग्लजच्या नवीन क्रीडांगणाचा प्रश्न
गडहिंग्लज येथील एम.आर. हायस्कूलच्या नवीन क्रीडांगणासाठी प्रस्तावित जागा जिल्हा परिषद अधिपत्याखाली असल्याने ती जागा जिल्हा परिषदेच्या नावे करण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. क्रीडांगणाच्या जागेसंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया आणि आवश्यक कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, एकनाथ काळबांडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर, क्रांतीकुमार मिरजकर, युवराज पाटील, भैय्या माने यांच्यासह उपअभियंते सी. ए. पाटील, बी. ए. पुजारी, एम. पी. पाटील, संबंधित कंत्राटदार आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
बैठकीत रस्ते विकासकामे, जमीनविषयक प्रश्न आणि स्थानिक पायाभूत सुविधांशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.