५६ हजार कोटींच्या सागरी प्रकल्पांना गती द्या; सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा – मंत्री नितेश राणे
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ५६ हजार १७ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. तसेच सिंधुदुर्गातील वादळामुळे विस्कळीत झालेला वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी आणि जलवाहतूक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत करण्यात आलेल्या ५६ हजार १७ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेतली. राज्यातील सागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेत सर्व प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
राज्यातील बंदरविकास, जहाजबांधणी, जलवाहतूक आणि सागरी उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत १९ सामंजस्य करार केले आहेत. बैठकीला बंदरे व परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. उपस्थित होते.
दिघी पोर्ट विस्तार, जयगड व धरमतर पोर्ट विकास, आधुनिक जहाजबांधणी सुविधा उभारणी तसेच मुंबई वॉटर मेट्रोसाठी आधुनिक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचे प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहेत. जहाजबांधणी उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या सहकार्याने प्रशिक्षण आणि संशोधन उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत.
या सर्व प्रकल्पांमुळे राज्यातील किनारी भागात उद्योगवाढ, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे सांगत मंत्री राणे यांनी सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्राच्या सागरी क्षमतेचा पूर्ण वापर करून राज्याला जागतिक स्तरावरील सागरी हब बनविण्यासाठी काटेकोर अंमलबजावणी आणि प्रभावी पाठपुरावा करण्यावर त्यांनी भर दिला.
सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे आदेश
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडील वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी तातडीची आढावा बैठक घेत प्रशासनाला वीज व पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश दिले.
वादळामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. महावितरणकडून लोखंडी आरसीसी खांब व इतर आवश्यक साहित्य विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, कणकवली आणि कुडाळसह संपूर्ण जिल्ह्यात ब्रेकडाऊन पथके २४ तास कार्यरत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
“आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे फोन वेळेवर उचला, मिस्ड कॉललाही तात्काळ प्रतिसाद द्या आणि तक्रार निवारणात विलंब होऊ देऊ नका,” असे स्पष्ट निर्देश मंत्री राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
एल-निनोच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य हवामान बदल आणि आपत्ती लक्षात घेऊन महावितरणसह सर्व विभागांनी अधिक सक्षम नियोजन करावे, मनुष्यबळ आणि यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0