नॅचरल शुगरचा विदर्भात पुन्हा डंका; उसाला प्रतिटन २,९१३ रुपयांचा विक्रमी अंतिम दर जाहीर
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या युनिट-२ कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ साठी उसाला प्रतिटन २,९१३ रुपयांचा विदर्भातील सर्वोच्च अंतिम दर जाहीर केला आहे. १५ जूनपासून अंतिम हप्ता वाटप सुरू होणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यवतमाळ प्रतिनिधी : रवी वाघमारे
यवतमाळ, दि. १३ जून : शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या गुंज सवना (ता. महागाव) येथील युनिट-२ कारखान्याने चालू २०२५-२६ गाळप हंगामासाठी उसाला प्रतिटन तब्बल २,९१३ रुपयांचा अंतिम दर जाहीर केला आहे. हा दर विदर्भातील सर्वाधिक अंतिम ऊसदर मानला जात असून या घोषणेमुळे यवतमाळ जिल्ह्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारखान्याचे अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी ही घोषणा करताना सांगितले की, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अद्याप मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झालेला नसल्याने शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामाच्या तयारीचे आव्हान आहे. खत व्यवस्थापन, मशागत आणि पेरणीसाठी आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने शेतकऱ्यांना विक्रमी दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नॅचरल उद्योग समूहाने नेहमीच विदर्भातील शेतकऱ्यांना राज्यातील आणि देशातील स्पर्धात्मक दर देण्याची परंपरा कायम ठेवली असून यंदाही तीच परंपरा पुढे चालू ठेवण्यात आली आहे.
५.५५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप
नॅचरल शुगर युनिट-२ ने आपल्या दहाव्या गाळप हंगामात एकूण ५.५५ लाख मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले आहे. कारखान्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना ऊस कारखान्यात आल्यानंतर अवघ्या १४ दिवसांत २,७०० रुपये प्रतिटन या दराने पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करून दिलासा दिला होता.
१५ जूनपासून अंतिम हप्त्याचे वाटप
कारखाना प्रशासनाने आता उर्वरित २१३ रुपये प्रतिटन असलेला दुसरा आणि अंतिम हप्ता १५ जून २०२६ पासून धनादेशाद्वारे (चेक) वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर हा निधी मिळाल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी आवश्यक आर्थिक मदत मिळणार आहे.
कारखाना प्रशासनाच्या मते, अंतिम हप्ता वेळेत मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे.
शेतकरीहिताच्या निर्णयाचे स्वागत
नॅचरल शुगरच्या या निर्णयाचे संपूर्ण विदर्भातून स्वागत होत असून शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांनी कारखाना व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर मिळालेला विक्रमी ऊसदर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली नॅचरल शुगरने पुन्हा एकदा शेतकरीहिताला प्राधान्य देत विदर्भातील साखर उद्योगात आपला दबदबा कायम असल्याचे सिद्ध केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0