पालिकेच्या ‘100 टक्के नालेसफाई’ दाव्याची पोलखोल; मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये कामच नसल्याचा आरोप

मुंबई महानगरपालिकेने नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी मानखुर्द-शिवाजीनगर, गोवंडी आणि बैंगणवाडी परिसरात प्रत्यक्षात एक टक्काही काम झाले नसल्याचा आरोप नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी केला आहे. पाहणीदरम्यान अनेक नाले गाळ आणि कचऱ्याने भरलेले आढळल्याने पालिकेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Jun 13, 2026 - 20:52
 0  8
पालिकेच्या ‘100 टक्के नालेसफाई’ दाव्याची पोलखोल; मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये कामच नसल्याचा आरोप
मुंबई महानगरपालिका, नालेसफाई, मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी,

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) – पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती याच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याचा आरोप नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी केला आहे. मानखुर्द-शिवाजीनगर, गोवंडी आणि बैंगणवाडी परिसरातील नाल्यांची पाहणी केल्यानंतर पालिकेच्या दाव्याची पोलखोल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नगरसेविका राजोल पाटील यांनी प्रभाग क्रमांक १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९ आणि १४२ मधील मोठ्या व लहान नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी नाले गाळ, कचरा आणि घाणीने भरलेले असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी नालेसफाईचे काम सुरूही झाले नसल्याचे दिसून आले.

पालिकेकडून नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी नालेसफाई पूर्ण झाल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. मात्र वास्तवात परिस्थिती गंभीर असून पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली साफसफाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. पाहणीदरम्यान उपस्थित पालिका अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्ष स्थिती पालिकेच्या दाव्याला छेद देणारी असल्याचे राजोल पाटील यांनी स्पष्ट केले.

त्यांनी पुढे सांगितले की, मानखुर्द-शिवाजीनगर परिसरातील एकही नाला योग्य पद्धतीने साफ करण्यात आलेला नाही. पालिका प्रशासन केवळ कागदोपत्री नालेसफाई पूर्ण झाल्याचे दाखवत असून नागरिकांना पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती आणि पाणी तुंबण्याच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते.

यंदाच्या पावसाळ्यातही परिसरात पाणी साचण्याची आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने उर्वरित नालेसफाईची कामे पूर्ण करावीत. अन्यथा नागरिकांना होणाऱ्या त्रासासाठी पालिका प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला.

या पाहणी दौऱ्यात विभाग संघटिका प्रज्ञा सकपाळ, विधानसभा प्रमुख संजय चव्हाण, मोहम्मद अरशद, अभिजीत चव्हाण, शाखाप्रमुख अर्जुन शिंदे, एकनाथ खराडे, मोहन सोंडगे आणि शिवाजी झोरे यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1