इराण-इस्रायल युद्धबंदीच्या हालचालींचे स्वागत; जागतिक शांततेसाठी भारताच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक – यशवंतभाऊ भोसले
इराण-इस्रायल संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शांतता कराराचे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी स्वागत केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीमुळे जागतिक शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाल्याचा दावा त्यांनी केला.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) : आखाती प्रदेशात सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाला आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या जागतिक शांतता कराराचे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी स्वागत केले आहे.
यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना भोसले यांनी सांगितले की, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर आर्थिक आणि सामाजिक परिणाम जाणवू लागले होते. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतींमध्ये वाढ होऊन महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत होता. अशा परिस्थितीत युद्धबंदीच्या दिशेने होणाऱ्या हालचाली सकारात्मक आणि दिलासादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.
भोसले म्हणाले की, संघर्ष सुरू होण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा केला होता. तसेच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी विविध आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा केली होती. भारताने या संपूर्ण घडामोडीत संतुलित आणि जबाबदार भूमिका घेतली. भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे शांततेसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत झाल्याचा दावा त्यांनी केला.
राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने युद्धाच्या सुरुवातीलाच शांततेसाठी रॅली काढून युद्ध थांबवण्याचे आवाहन करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शांतता कराराला इराणकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त असून, लवकरच याबाबत अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे. हा करार प्रत्यक्षात यशस्वीपणे अंमलात आला तर जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार आणि सर्वसामान्यांचे जीवन पुन्हा सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी यशवंतभाऊ भोसले म्हणाले, "गेल्या काही दिवसांत इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा अस्थिर परिस्थितीत शांततेच्या दिशेने होणारा प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. जागतिक शांततेसाठी भारताने घेतलेली भूमिका आणि मुत्सद्देगिरी कौतुकास्पद आहे."
युद्धाची परिस्थिती कायमस्वरूपी निवळून भविष्यात अशा संघर्षांना आळा बसावा आणि जगभरात शांततेचे वातावरण निर्माण व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0