अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण करा; मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश
रायगड जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या १०० विद्यार्थी क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ५०० खाटांच्या रुग्णालय आणि अनुषंगिक इमारतींच्या प्रकल्पाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा घेतला. प्रकल्पाची सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मुंबई | प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पाच्या कामाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी सविस्तर आढावा घेतला. प्रकल्पातील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अलिबाग येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामध्ये १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ५०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय आणि विविध अनुषंगिक इमारतींचा समावेश आहे.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, हा प्रकल्प रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागासाठी आरोग्य सेवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होतील तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना स्थानिक स्तरावर गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा मिळतील.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोकणातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी मोठा पर्याय उपलब्ध होणार असून नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0