सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक; ‘लोकसंवाद-२०२६’मध्ये सायबर सुरक्षेवर विशेष मार्गदर्शन

गडचिरोलीतील आष्टी येथे ‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सायबर सुरक्षा मार्गदर्शन; डिजिटल व्यवहार, सोशल मीडिया आणि ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी नागरिकांना सूचना.

Sep 23, 2026 - 23:16
 0  6
सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक; ‘लोकसंवाद-२०२६’मध्ये सायबर सुरक्षेवर विशेष मार्गदर्शन
लोकसंवाद 2026, सायबर सुरक्षा, सायबर फसवणूक, डिजिटल व्यवहार, ऑनलाइन फसवणूक, संजय त्रिपाठी, गडचिरोली सायबर सुरक्षा,

प्रतिनिधी: राजेंद्र किलनाके 

गडचिरोली, दि. 23 सप्टेंबर : डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असताना सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलत आहेत. ऑनलाइन आर्थिक फसवणूक तसेच वैयक्तिक माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना विशेष सतर्कता बाळगावी. अनोळखी लिंक, संदेश किंवा आकर्षक आमिषांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा करावी, असे आवाहन राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे माहिती व तंत्रज्ञान संचालक तथा इंटर-ऑपरेशनल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली आणि महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे ‘सायबर सुरक्षा – सुरक्षित रहा, जागरूक रहा’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी संजय त्रिपाठी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांना सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मुसाने, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

ऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता आवश्यक

ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल व्यवहार करताना केवळ अधिकृत संकेतस्थळे आणि अधिकृत ॲप्सच वापरावेत. मोबाईल किंवा ई-मेलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. OTP, पासवर्ड, बँक खाते क्रमांक किंवा आर्थिक व्यवहारांशी संबंधित गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असा सल्ला संजय त्रिपाठी यांनी दिला.

लॉटरी, नोकरी, बक्षीस किंवा आकर्षक आर्थिक लाभाचे आमिष दाखविणाऱ्या संदेशांवर खातरजमा केल्याशिवाय विश्वास ठेवू नये. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईलमध्ये कोणतेही ॲप डाउनलोड करू नये किंवा आर्थिक व्यवहार करू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सायबर सुरक्षेसाठी तांत्रिक उपाय महत्त्वाचे असले तरी प्रत्येक डिजिटल वापरकर्त्याची जागरूकता आणि सावधगिरी तितकीच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी

सोशल मीडिया वापरताना वैयक्तिक माहिती, मोबाईल क्रमांक, लोकेशन, प्रवासाची माहिती आणि खासगी छायाचित्रे सार्वजनिकपणे शेअर करताना विशेष दक्षता घ्यावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.

सोशल मीडिया आणि ई-मेल खात्यांसाठी मजबूत व वेगवेगळे पासवर्ड वापरावेत. टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू ठेवावे. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट आणि संदेशांबाबतही सावध राहावे, असे त्रिपाठी यांनी सांगितले.

सायबर बुलिंग, आवाजाची नक्कल, बनावट चेहरा, बनावट सोशल मीडिया प्रोफाइल आणि आयडेंटिटी थेफ्ट अर्थात ओळख चोरी यांसारख्या सायबर गुन्ह्यांबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना माहिती दिली.

फसवणूक झाल्यास तातडीने 1930 वर संपर्क

ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा. तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी, असे यावेळी सांगण्यात आले.

सायबर गुन्ह्याची घटना घडल्यानंतर भीतीपोटी ती लपवून न ठेवता शक्य तितक्या लवकर संबंधित अधिकृत यंत्रणेकडे तक्रार करणे आवश्यक आहे. फसवणुकीशी संबंधित संदेश, स्क्रीनशॉट, व्यवहाराची माहिती आणि इतर उपलब्ध पुरावे सुरक्षित ठेवावेत, असेही मार्गदर्शन करण्यात आले.

थेट प्रसारणातून व्यापक जनजागृती

या कार्यक्रमाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रसारण करण्यात आले. त्यामुळे महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांसोबतच जिल्ह्यातील विविध भागांतील नागरिक आणि युवकांनाही सायबर सुरक्षेबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळाली.

विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यासाठी थेट प्रसारणाचा उपयोग करण्यात आला.

डिजिटल सेवांचा सुरक्षित वापर, सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी आणि फसवणूक झाल्यास उपलब्ध तक्रार निवारण यंत्रणेबाबत नागरिक व युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

‘लोकसंवाद-२०२६’मधून नागरिकांशी थेट संवाद

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद-२०२६’ या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विषयांबाबत नागरिकांशी थेट संवाद साधून तज्ज्ञांच्या माध्यमातून उपयुक्त माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालय तसेच महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.