पुणे ग्रँड टूर २०२७ च्या तयारीला वेग द्या; रस्ते, वाहतूक, सुरक्षा व वैद्यकीय सुविधांचे नियोजन वेळेत पूर्ण करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे ग्रँड टूर २०२७ च्या आयोजनासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. रस्ते, वाहतूक, सुरक्षा व वैद्यकीय सुविधांची तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

पुणे ग्रँड टूर २०२७ च्या तयारीला वेग द्या; रस्ते, वाहतूक, सुरक्षा व वैद्यकीय सुविधांचे नियोजन वेळेत पूर्ण करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पुणे ग्रँड टूर २०२७, सुनेत्रा अजित पवार, पुणे सायकल स्पर्धा, पुणे आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा, पुणे वाहतूक नियोजन, रस्ते सुरक्षा, ब्लॅक स्पॉट, पुणे पोलीस, पीएमआरडीए, पुणे महानगरपालिका, जागतिक सायकल स्पर्धा २०३२

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

पुणे : पुणे ग्रँड टूर २०२७ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या आयोजनाची तयारी अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना दिले आहेत. स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांचा विकास, वाहतूक व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षाव्यवस्था यांना प्राधान्य देऊन सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. तसेच जिल्ह्यातील अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर तातडीने सुधारात्मक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे ग्रँड टूर २०२७ च्या आयोजनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, आमदार हेमंत रासने, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे ग्रँड टूरला जागतिक स्तरावर ओळख

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दिवंगत अजित पवार यांच्या पुढाकारातून पुणे जिल्ह्यात पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची सुरुवात झाली. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पुणेकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे अल्पावधीतच या स्पर्धेला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे २०३२ मध्ये जागतिक सायकल फेडरेशनची चॅम्पियनशिप पुण्यात आयोजित करण्यास मान्यता मिळाली आहे. ही पुणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे, असे त्यांनी नमूद केले.

यंदा २५ संघांचा सहभाग; आयोजनाची व्याप्ती वाढली

२०२७ मधील पुणे ग्रँड टूरची व्याप्ती मागील वर्षाच्या तुलनेत वाढली असून यंदा २५ संघ सहभागी होणार आहेत. जागतिक स्तरावरून सुमारे ९० संघांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यातून २५ संघांची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेचा मार्गही निश्चित करण्यात आला आहे.

वाढलेली व्याप्ती लक्षात घेता आयोजनाची जबाबदारी अधिक महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणेच सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.

रस्त्यांच्या कामांचा दर्जा राखण्याचे निर्देश

स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत.

या कामांमध्ये रस्त्यांची गुणवत्ता आणि दर्जा राखण्यावर विशेष लक्ष द्यावे. एकाच ठिकाणी एकापेक्षा अधिक शासकीय यंत्रणा काम करत असल्यास कामांमध्ये समन्वय ठेवून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. लोकप्रतिनिधींनी रस्त्यांच्या कामांबाबत मांडलेल्या सूचनांची संबंधित विभागांनी दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन

स्पर्धेच्या कालावधीत शहरातील वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता असल्याने पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांनी विशेष वाहतूक आराखडा तयार करावा. स्पर्धेमुळे कोणते रस्ते बंद राहणार आहेत, वाहतुकीत कोणते बदल केले जाणार आहेत आणि पर्यायी मार्ग कोणते असतील, याची माहिती नागरिकांना आगाऊ आणि व्यापक स्वरूपात द्यावी, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

तसेच स्पर्धेच्या मार्गावर आवश्यक वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने आतापासूनच पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील २२ ब्लॅक स्पॉटवर सुरक्षा उपाययोजना

जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणे अर्थात ब्लॅक स्पॉट हा रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर विषय असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले. संबंधित रस्ते यंत्रणांनी या ठिकाणी आवश्यक सुधारात्मक उपाययोजना वेगाने पूर्ण कराव्यात. या कामांचा पुन्हा आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बैठकीत माहिती देताना सांगितले की, पुणे ग्रँड टूरसाठी २६ आणि ३१ जानेवारी या सुट्टीच्या दिवशी सुमारे ३७० किलोमीटरचा स्पर्धा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीवरील संभाव्य परिणाम कमी करण्यास मदत होणार आहे.

तसेच जिल्ह्यातील २२ ब्लॅक स्पॉटवर रस्ते सुरक्षा उपाययोजना, दिशादर्शक फलक (सायनेज), पथदिवे, सीसीटीव्ही यंत्रणा आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासंबंधीची कामे पुढील ६० दिवसांत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. स्पर्धेच्या आयोजनात सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

२०३२ च्या जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचे आयोजन

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे ग्रँड टूर २०२७ च्या नियोजनाची माहिती सादर केली. स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते विकासासाठी विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जागतिक स्तरावरील सुमारे ९० संघांच्या अर्जांतून २५ संघांची निवड करण्यात येणार आहे. २०३२ मध्ये पुण्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदाचे आयोजन अधिक सक्षम आणि दर्जेदार करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींच्या सूचनांवर कार्यवाही करण्याचे आदेश

बैठकीत आमदार सुनील शेळके, चेतन तुपे, शंकर मांडेकर, बाबाजी काळे आणि हेमंत रासने यांनी स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांची कामे, वाहतूक नियोजन, नागरिकांच्या सुविधा आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत विविध मुद्दे मांडले. या सूचनांवर सविस्तर चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पुणे ग्रँड टूर २०२७ ही स्पर्धा पुण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मोठी ओळख मिळवून देणारी ठरणार आहे. त्यामुळे सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करून मागील वर्षापेक्षा अधिक भव्य, सुरक्षित आणि यशस्वी आयोजन करण्यासाठी दिलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.