चाळीसगाव सोलर प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी करा; बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्याचे बावनकुळे यांचे निर्देश
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव सोलर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सखोल चौकशी करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. जमीन संपादन, मोबदला आणि खरेदी व्यवहारांची तपासणी करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई, दि. 10 : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात उभारण्यात आलेल्या सोलर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी आणि प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचे झोनिंग करून सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत आमदार मंगेश चव्हाण आणि जळगावचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
बैठकीत बावनकुळे यांनी सोलर प्रकल्पासाठी संपादित जमिनींचे सर्वेक्षण करून विविध झोनमधील जमिनींचा तपशील गोळा करण्याचे निर्देश दिले. तसेच भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना रेडीरेकनरनुसार योग्य मोबदला मिळाला आहे का, याची पडताळणी करून अहवाल शासनाकडे सादर करण्यास सांगितले.
याशिवाय, शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मोबदल्याची तीन जिल्ह्याबाहेरील स्वयंसेवी संस्थांमार्फत स्वतंत्र चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी सोलर प्रकल्पासाठी झालेल्या जमीन खरेदी व्यवहारांचीही चौकशी करण्याचे आदेश दिले. पात्र असूनही ज्यांना मोबदला मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना तातडीने रक्कम देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले.
तसेच प्रकल्प क्षेत्रातील इको-सेन्सिटिव्ह झोन, अभयारण्य क्षेत्र आणि अन्य संबंधित जमिनींबाबत अचूक माहिती संकलित करून 15 दिवसांच्या आत सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

