आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाइन योग सत्रातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालय आणि हॅबिल्ड हेल्थटेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जून रोजी ऑनलाइन योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी ऑनलाइन योगासने करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार असून नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Jun 12, 2026 - 22:29
 0  3
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाइन योग सत्रातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
आंतरराष्ट्रीय योग दिन 2026, ऑनलाइन योग सत्र, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड,

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त नागरिकांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि व्यापक सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि हॅबिल्ड हेल्थटेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने एका ऐतिहासिक ऑनलाइन योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी ऑनलाइन योगासने करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या जागतिक विक्रमाचा भाग बनण्याची सुवर्णसंधी सर्व नागरिकांना उपलब्ध झाली असून अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

दिनांक : 14 जून 2026

वेळ : सकाळी 6.15 ते 7.15

माध्यम : आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर ऑनलाइन

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 1800-315-7008 या टोल-फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. मिस्ड कॉल दिल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर सहभागींना सत्राची लिंक तसेच आवश्यक सूचना एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपद्वारे पाठविण्यात येतील.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रत्येक सहभागाची स्वतंत्र नोंद होणे आवश्यक असल्यामुळे प्रत्येक सहभागीने स्वतःच्या स्वतंत्र डिजिटल उपकरणावरून (मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबलेट) लॉग-इन करणे बंधनकारक आहे. एकाच स्क्रीनवर अनेक व्यक्ती सहभागी झाल्यास तो केवळ एकच सहभाग मानला जाईल. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने स्वतंत्र उपकरणावरून सत्रात सहभागी व्हावे.

योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याबरोबरच भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0