गणरायाच्या दर्शनासोबत योजनांचा जागर; ‘लोकसंवाद-२०२६’मधून शेगावात लोककल्याणकारी योजनांची माहिती

शेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी क्लब गणेश मंडळात ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत कृषी, आरोग्य, महिला व बालविकास आणि महसूल विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची नागरिकांना माहिती देण्यात आली.

Sep 24, 2026 - 23:56
 0  3
गणरायाच्या दर्शनासोबत योजनांचा जागर; ‘लोकसंवाद-२०२६’मधून शेगावात लोककल्याणकारी योजनांची माहिती
शेगाव गणेशोत्सव, लोकसंवाद २०२६, गणरायाचे दर्शन आणि योजनांची माहिती, शासनाच्या योजना, कृषी योजना, शेतकरी योजना, महिला व बालविकास योजना, आरोग्य योजना, महसूल विभाग योजना, गणेश मंडळ,

प्रतिनिधी : महेंद्र मिश्रा 

शेगाव : गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना यंदा केवळ आशीर्वादच नव्हे, तर शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहितीही मिळाली. ‘गणरायाचे दर्शन आणि योजनांची माहिती’ या अभिनव संकल्पनेतून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाला शेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी क्लब गणेश मंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने गणेश मंडळांच्या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत आहेत. या संधीचा उपयोग करून शासनाच्या विविध योजना, सुविधा आणि लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम जिल्हा माहिती कार्यालयाने हाती घेतला आहे.

कृषी योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शेगाव येथील कार्यक्रमात कृषी, महिला व बालविकास, आरोग्य तसेच महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. उपलब्ध सुविधा, योजनांसाठीची पात्रता तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

महिला व बालकांच्या योजनांची माहिती

महिला व बाल विकास पर्यवेक्षक शुभांगी जाधव यांनी महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे, शासनाच्या विविध योजना तसेच उपलब्ध सुविधांची माहिती दिली.

महिला व बालकांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, यासाठी आवश्यक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि समुपदेशन

समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत जोशी यांनी उपस्थित नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील आरोग्यविषयक काळजी, उपलब्ध आरोग्य सुविधा आणि आवश्यक त्या आरोग्य सेवांबाबत नागरिकांना माहिती व समुपदेशन करण्यात आले.

महसूल विभागाच्या योजनांचीही माहिती

नायब तहसीलदार विजय सुरडकर आणि ऋतुजा पारखे यांनी महसूल विभागाच्या विविध लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, महत्त्वाची कागदपत्रे, ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया तसेच संबंधित विभागाशी संपर्क साधण्याची पद्धत याबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

गणेश मंडळ ठरले योजनांच्या माहितीचे व्यासपीठ

गणेश मंडळाचा परिसर केवळ धार्मिक उत्सवाचे केंद्र न राहता शासनाच्या योजनांची माहिती मिळविण्याचे व्यासपीठ ठरल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. विशेषतः शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी विविध योजनांबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली.

गावपातळीवरच शासनाच्या योजनांची माहिती उपलब्ध झाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांना योजनांची माहिती देण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे यावेळी दिसून आले.

‘योजना समजून घ्या, पात्रतेनुसार लाभ घ्या’

‘योजना समजून घ्या, पात्रतेनुसार लाभ घ्या’ या उद्देशाने सर्व पात्र नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घ्यावी आणि उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी धनंजय देशमुख, महिला व बाल विकास पर्यवेक्षक शुभांगी जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत जोशी, नायब तहसीलदार विजय सुरडकर, ऋतुजा पारखे, ह.भ.प. संतोष महाराज वसत्कार, प्रेस क्लब शेगावचे अध्यक्ष तथा मीडिया प्रतिनिधी महेंद्र मिश्रा, लोकमतचे तालुका प्रतिनिधी अनिल उंबरकर, धनराज ससाने, मंडळाचे अध्यक्ष वरुण नागपाल, संस्थापक सदस्य कमलाकर चव्हाण, जिल्हा माहिती कार्यालयाचे जयंत वानखडे, उप माहिती कार्यालयाचे ललितकुमार ढोकणे तसेच गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.