शंकर महाराज समाधी मठाचा अनधिकृत अन्नछत्र समितीशी संबंध नाही; विश्वस्त मंडळाचे स्पष्टीकरण
धनकवडी येथील श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी मठाच्या स्वयंपाकघराची एफडीए अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली असून कोणतीही त्रुटी आढळली नाही. अनधिकृत शंकर महाराज अन्नछत्र समितीचा मठाशी संबंध नसल्याचे विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले.
प्रतिनिधी : रोहन सोनाळे
एफडीएच्या तपासणीत स्वयंपाकघर व प्रसाद वाटप व्यवस्थेत कोणतीही त्रुटी आढळली नाही; भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन
पुणे : धनकवडी येथील श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी मठातील प्रसाद वाटप व्यवस्था नियमितपणे सुरू असून, मठाच्या स्वयंपाकघराची अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळल्या नसल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मिहीर कुलकर्णी आणि सचिव सतीश कोकाटे यांनी स्पष्ट केले.
श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट (ए-७९३) यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचा रीतसर अधिकृत परवाना आहे. शंकर महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त एफडीए, पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी समाधी मठातील अद्ययावत स्वयंपाकघर तसेच प्रसाद वाटप व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. या तपासणीत कोणत्याही त्रुटी निदर्शनास आल्या नसल्याचे ट्रस्टने जाहीर निवेदनाद्वारे सांगितले.
अनधिकृत अन्नछत्र समितीशी मठाचा संबंध नसल्याचे स्पष्ट
दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी वर्तमानपत्रे आणि समाजमाध्यमांवर अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्या या समाधी मठाच्या बाहेरील अनधिकृत 'शंकर महाराज अन्नछत्र समिती' संदर्भातील आहेत. या समितीचा श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ अथवा समाधी ट्रस्टशी कोणताही संबंध नाही, असे विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.
संबंधित कारवाईच्या बातम्यांमुळे समाधी ट्रस्टबाबत भाविकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये किंवा कोणाचीही दिशाभूल होऊ नये, यासाठी विश्वस्त मंडळाने हे स्पष्टीकरण दिले आहे. समाधी मठातील प्रसाद वाटपाची व्यवस्था नेहमीप्रमाणे नियमितपणे सुरू असल्याचेही ट्रस्टने नमूद केले.
भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
समाधी मठ आणि अनधिकृत अन्नछत्र समिती यांच्यातील संबंधाबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी विश्वस्त मंडळाने भाविकांना वस्तुस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अपुऱ्या माहितीवर अथवा अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मिहीर कुलकर्णी, सचिव सतीश कोकाटे, तसेच विश्वस्त सुरेंद्र वाईकर, डॉ. पी. डी. पाटील, निलेश मालपाणी आणि प्रताप भोसले यांनी भाविकांना आवाहन केले आहे.
संपर्क व माध्यम समन्वय : संजय गायकवाड