गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आधुनिक सुविधांसह कामे वेगात पूर्ण करण्यावर भर; मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश
गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीची कामे आधुनिक सुविधांसह जलद गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाढीव खर्च मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
मुंबई, दि. २९ : गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीची कामे अत्याधुनिक सुविधांसह जलद गतीने पूर्ण करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली.
बैठकीत गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाढीव खर्चास मान्यता मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावर बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी उच्चाधिकार समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार विनोद अग्रवाल तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव धीरज कुमार उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषानुसार या महाविद्यालय संकुलासाठी राज्य शासनाकडून वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. सध्या प्रशासकीय इमारत आणि विविध विभागांची कामे प्रगतीपथावर असून, विद्यार्थ्यांना व रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व सुविधा आधुनिक पद्धतीने उभारण्यात येत आहेत.
बैठकीत खासदार प्रफुल्ल पटेल आणि आमदार विनोद अग्रवाल यांनी महाविद्यालय अधिक सुसज्ज व आधुनिक करण्यासाठी विविध सूचना मांडल्या. तसेच हे प्रकल्प काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
संकुलामध्ये मुख्य प्रशासकीय इमारत, ऑडिटोरियम, ॲनाटॉमी विभाग, शल्यचिकित्सा गृह, वॉर्ड, अतिदक्षता विभाग (ICU), एनआयसीयू यांसह अनेक अत्यावश्यक सुविधा उभारल्या जात आहेत.
सध्या या प्रकल्पासाठी सुमारे ७९० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, अतिरिक्त सुविधा आणि शल्यचिकित्सा गृहांची संख्या वाढविण्याच्या प्रस्तावामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यासह विदर्भातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
