पालघरच्या विकासाला वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदर, बुलेट ट्रेनसह महत्त्वाच्या प्रकल्पांची केली पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा करून वाढवण बंदर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, प्रस्तावित वाढवण आंतरराष्ट्रीय विमानतळ, नारिंगी खाडी पूल आणि उत्तन–विरार सागरी सेतू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पाहणी केली. या प्रकल्पांमुळे राज्याच्या पायाभूत सुविधा, उद्योग, वाहतूक आणि रोजगाराला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Jun 29, 2026 - 17:28
 0  4
पालघरच्या विकासाला वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदर, बुलेट ट्रेनसह महत्त्वाच्या प्रकल्पांची केली पाहणी
पालघर विकास, देवेंद्र फडणवीस

पालघर | प्रतिनिधी देवानंद शिंदे 

राज्याच्या पायाभूत सुविधा, उद्योग, वाहतूक आणि आर्थिक विकासाला गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी वाढवण बंदर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, प्रस्तावित वाढवण आंतरराष्ट्रीय विमानतळ, नारिंगी खाडी पूल आणि उत्तन–विरार सागरी सेतू या प्रकल्पांच्या कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

वाढवण बंदर प्रकल्पाचा आढावा

चिंचणी येथील समुद्रकिनाऱ्यावर प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी अंतर्गत रस्ते, वन मंजुरी, वीजपुरवठा, रेल्वे जोडणी, भूसंपादन, पाणीपुरवठा, कौशल्य विकास तसेच मच्छीमारांच्या नुकसानभरपाईच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

सुमारे ७६ हजार २२० कोटी रुपये खर्चाच्या या ग्रीनफिल्ड बंदराची उभारणी १,४४८ हेक्टर क्षेत्रावर करण्यात येणार असून पुढील ६० महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अत्याधुनिक मोठ्या जहाजांची हाताळणी करण्याची क्षमता असलेले हे बंदर देशातील प्रमुख खोल समुद्री बंदरांपैकी एक ठरणार आहे.

बुलेट ट्रेन आणि विमानतळ प्रकल्पाची पाहणी

मुख्यमंत्र्यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बोईसर स्थानकाच्या कामांची पाहणी करून प्रकल्प नियोजित वेळेत आणि उच्च दर्जासह पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच प्रस्तावित वाढवण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेचीही पाहणी करण्यात आली. हा विमानतळ डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC), बुलेट ट्रेन, उत्तन–विरार सागरी सेतू, मुंबई–वडोदरा द्रुतगती मार्ग आणि मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार असल्याने मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.

नारिंगी खाडी पूल आणि उत्तन–विरार सागरी सेतू

एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येणाऱ्या नारिंगी खाडी पुलाच्या कामाचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. सुमारे ८५० कोटी रुपये खर्चाच्या या ४.१० किलोमीटर लांबीच्या पुलामुळे वसई-विरारचा सफाळे, पालघर आणि बोईसरशी थेट संपर्क होणार असून प्रवासाचे अंतर सुमारे ४० किलोमीटरने आणि वेळ ४५ मिनिटांनी कमी होणार आहे.

याशिवाय सुमारे ५८ हजार ७५४.५१ कोटी रुपये खर्चाच्या उत्तन–विरार सागरी सेतू प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. सहापदरी सागरी सेतू, चारपदरी जोडरस्ते आणि आपत्कालीन मार्गिकांमुळे दक्षिण मुंबई ते अहमदाबाद प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

'गेमचेंजर' प्रकल्प

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील हे सर्व प्रकल्प राज्यातील बंदर विकास, उद्योग, वाहतूक, निर्यात आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने 'गेमचेंजर' ठरणार असल्याचे सांगितले.

या दौऱ्यावेळी वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0