वैनगंगा नदीवर बॅरेजेसचे जाळे; पूर्व विदर्भातील 53 हजार हेक्टरहून अधिक शेतीला मिळणार शाश्वत पाणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून वैनगंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या बॅरेजेसच्या जाळ्यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 53 हजार 622 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे जवळपास 198 गावांतील शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध होणार असून पूर्व विदर्भातील जलसमृद्धीकडे मोठे पाऊल पडणार आहे.
गडचिरोली, दि. 16 : पूर्व विदर्भातील जलसंकट दूर करून शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वैनगंगा नदीवर बॅरेजेसचे व्यापक जाळे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकार होत असलेल्या या प्रकल्पामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला वर्षभर पाणी उपलब्ध होणार आहे.
जलसंपदा विभागामार्फत वैनगंगा नदीवर पूर्ण झालेले, बांधकामाधीन आणि प्रस्तावित बॅरेजेसच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असताना 1 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या निर्देशांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नदीवरील जलसंपत्तीचा अधिक प्रभावी वापर करून पूर्व विदर्भातील जलसमृद्धीचा मार्ग मोकळा करण्यावर त्यांनी भर दिला होता.
विचिडोह बॅरेजमुळे 16 गावांना लाभ
चामोर्शी तालुक्यातील विचिडोह बॅरेजचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित झाले आहे. या बॅरेजमुळे तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेला पाणीपुरवठा होत असून चामोर्शी परिसरातील 16 गावांमधील सुमारे 4,330 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
विचिडोह बॅरेजची एकूण साठवण क्षमता 62.35 दशलक्ष घनमीटर असून सिंचन, पिण्याचे पाणी, औद्योगिक वापर आणि बाष्पीभवन लक्षात घेऊन 114.82 दशलक्ष घनमीटर पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोटगल बॅरेजचे काम वेगाने
गडचिरोली तालुक्यातील कोटगल बॅरेजचे काम सध्या प्रगतीपथावर असून जून 2027 पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाद्वारे पोला-वसा, कोटगल आणि गोगाव या उपसा सिंचन योजनांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 41 गावांतील सुमारे 10 हजार 199 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
ऐनबोथला आणि डोंगरसावंगी प्रकल्पांना गती
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित ऐनबोथला बॅरेजमुळे 69 गावांतील तब्बल 24 हजार 261 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक पाण्याची गरजही काही प्रमाणात भागवली जाणार आहे.
आरमोरी तालुक्यातील डोंगरसावंगी बॅरेजच्या माध्यमातून 17 गावांमधील 4 हजार 541 हेक्टर क्षेत्राला शाश्वत पाणीपुरवठा होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या सुधारित आराखड्यांचा आणि पिकपाणी गरजांचा अभ्यास वेगाने सुरू आहे.
198 गावांना होणार फायदा
विचिडोह, कोटगल, ऐनबोथला आणि डोंगरसावंगी हे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मिळून सुमारे 53 हजार 622 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जवळपास 198 गावांतील शेतकऱ्यांना वर्षभर शाश्वत पाणी उपलब्ध होणार असून भूजल पुनर्भरण, औद्योगिक विकास आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेलाही चालना मिळणार आहे.
पूर्व विदर्भातील कृषी अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन बळकटी देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. वैनगंगा खोऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी जलसंपदा विभागाने विविध प्रकल्पांना गती दिली असून भविष्यात या भागाच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0