महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून; १० जुलैपर्यंत मुंबईत होणार कामकाज

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन आणि कार्यक्रमाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Jun 16, 2026 - 01:37
 0  1
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून; १० जुलैपर्यंत मुंबईत होणार कामकाज
महाराष्ट्र विधिमंडळ, पावसाळी अधिवेशन 2026,

मुंबई प्रतिनिधी: नरेश शिंदे 

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार असल्याचा निर्णय विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आगामी अधिवेशनात राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

विधानभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते आणि सदस्य उपस्थित होते.

बैठकीस आमदार सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील तसेच विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन, संभाव्य विधेयके, प्रश्नोत्तरांचा कालावधी, शासकीय कामकाज आणि सभागृहाच्या कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिवेशन सुरळीत आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजनावर भर देण्यात आला.

२२ जूनपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात राज्यातील विकासकामे, पायाभूत सुविधा, शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगार तसेच विविध लोकहिताच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर जोरदार चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0