डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून योजनांचा प्रसार अधिक प्रभावी; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे प्रतिपादन
गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालयाने उभारलेल्या डिजिटल आउटडोर स्क्रीन उपक्रमाचे राज्याचे मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांनी कौतुक केले. शासनाच्या योजनांचा प्रभावी आणि जलद प्रसार करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली | प्रतिनिधी
राज्याचे मुख्य सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या डिजिटल आउटडोर स्क्रीन उपक्रमाचे कौतुक केले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावी, आकर्षक आणि कमी खर्चात पोहोचवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अत्याधुनिक डिजिटल स्क्रीन उभारण्यात आली आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती सातत्याने आणि प्रभावी पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे.
डिजिटल स्क्रीनची पाहणी करताना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पारंपरिक प्रसिद्धी माध्यमांसोबतच डिजिटल माध्यमांचा अधिक प्रभावी वापर करण्याची गरज अधोरेखित केली. शासनाच्या योजनांचा व्यापक स्तरावर आणि जलद गतीने प्रसार करण्यासाठी डिजिटल माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी विभागीय अपर आयुक्त माधवी खोडे आणि जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा उपस्थित होते. त्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण माध्यमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी डिजिटल स्क्रीनची संकल्पना, कार्यपद्धती, माहिती प्रसारणाची प्रक्रिया तसेच या उपक्रमातून नागरिकांना होणारे फायदे याबाबत मुख्य सचिवांना सविस्तर माहिती दिली.
गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालयाने राबविलेला हा डिजिटल उपक्रम शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत जलद, प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असून, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यास मदत करणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0