बीडमध्ये 80 वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात; ‘सदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडविण्याचा संकल्प

बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 80 वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड घडविण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Aug 15, 2026 - 20:42
Aug 22, 2026 - 18:33
 0  10
बीडमध्ये 80 वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात; ‘सदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडविण्याचा संकल्प
बीड स्वातंत्र्यदिन, सुनेत्रा अजित पवार, बीड ध्वजारोहण, बीड विकास, बीड जिल्हा,

मराठवाडा ब्यूरो : लक्ष्मण चौरे 

बीड, दि. 15 : सदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड घडविण्याचा शासनाचा संकल्प असून हा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येक बीडकराने साथ द्यावी, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी दिव्यांक गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार विजयसिंह पंडित आणि नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांचीही विशेष उपस्थिती होती.

विकासाच्या नव्या पर्वात बीडचा प्रवेश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या स्वातंत्र्य दिन संदेशात बीड जिल्हा विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत असल्याचे सांगितले. भारताने शेतीपासून अंतराळापर्यंत, शिक्षणापासून तंत्रज्ञानापर्यंत तसेच उद्योगापासून डिजिटल क्रांतीपर्यंत विविध क्षेत्रांत मोठी झेप घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान देणाऱ्या सर्व मुक्तिसैनिकांच्या कार्याला अभिवादन केले.

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर

जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेल्या बळीराजाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ७११ कोटी रुपये जमा करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात आणखी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून त्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने ॲग्री स्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १,४५९ कोटींचे अनुदान

२०२५-२६ मध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने १ हजार ४५९ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यापैकी आतापर्यंत ९ लाख २२ हजार ३६२ बाधित शेतकऱ्यांना ६३४ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला अधिक समृद्ध, हरित आणि जलसमृद्ध बनविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

जिल्हा विकासासाठी ६२३ कोटींचा निधी

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी यावर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ६२३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्याच्या गरजा लक्षात घेऊन या निधीतून प्राधान्याने विविध विकासकामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऊसतोड कामगारांसाठी ‘मिशन साथी’

ऊसतोड कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘मिशन साथी’ राबविण्यात येत आहे. आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड देण्यात आले आहेत.

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बीड शहरात उभारण्यात आलेले ‘संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृह’ हे महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीचे पहिले वसतिगृह असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

बीड-पुणे रेल्वे प्रकल्पाला गती

बीडच्या विकासासाठी बीड-पुणे रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापर्यंत ही रेल्वे पुण्यातील हडपसरपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच टाटा टेक्नॉलॉजीज आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेले १९६ कोटी रुपयांचे कौशल्य संवर्धन केंद्र पूर्णत्वास येत आहे. यामुळे जिल्ह्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकासाला चालना

परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ३०१ कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून या विकास प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रासाठी २५ कोटींचा निधी

ऑलिम्पिक पदकविजेते स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे यंदा बीड जिल्ह्यात आयोजन करण्यात येणार आहे. बीडच्या क्रीडा संकुलाच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन

बीडला प्रत्येक क्षेत्रात नव्या उंचीवर नेऊन समृद्ध, सक्षम आणि सुरक्षित जिल्हा घडविण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. पाटोदा तालुक्यातील जरेवाडी जिल्हा परिषद शाळा ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत याच धर्तीवर बीडमधील शैक्षणिक प्रवाह अधिक गतिमान करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिकांशी संवाद

कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी उपस्थितांशी वैयक्तिक संवाद साधला. तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांनाही स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री सहायता कक्ष आणि मुख्यमंत्री धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा रुग्णालयाच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमातून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेत शेती, शिक्षण, आरोग्य, रेल्वे, पर्यटन, कौशल्य विकास, क्रीडा आणि जलसंधारणाच्या माध्यमातून सक्षम बीड घडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 5
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.