सालगड्याच्या मुलाची जिद्दीला यशाची सलामी; बालाजी किरवले यांची एसआरपीएफ गट-२, पुणे येथे पोलिस हवालदारपदी निवड
हिंगोली जिल्ह्यातील पाळोदी गावातील सालगड्याच्या कुटुंबातील बालाजी किशन किरवले यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एसआरपीएफ गट-२, पुणे येथे पोलिस हवालदार पदासाठी निवड मिळवली आहे. त्यांच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीमुळे ग्रामीण भागातील युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
हिगोली प्रतिनिधी:भगवानराव मस्के
हिंगोली, दि. १९ जुलै : जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण हिंगोली जिल्ह्यातील पाळोदी गावातील बालाजी किशन किरवले यांनी घालून दिले आहे. सालगडी म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील बालाजी यांची एसआरपीएफ (स्टेट रिझर्व्ह पोलिस फोर्स) गट-२, पुणे येथे पोलिस हवालदार पदावर निवड झाली असून त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणी, कुटुंबाची जबाबदारी आणि मर्यादित साधनसामग्री अशा अनेक संकटांचा सामना करत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. अभ्यासाबरोबरच शारीरिक तयारीवरही विशेष भर देत त्यांनी सातत्याने मेहनत घेतली आणि अखेर पोलिस दलात स्थान मिळविण्याचे स्वप्न साकार केले.
प्रा. भगवानराव मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी किरवले यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे योग्य नियोजन, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.
बालाजी यांच्या यशाबद्दल पाळोदी गावातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. हिंगोली येथे भास्कराव पोले, पांडुरंग इमडे, गोपाल सातपुते, विनायक कवडे, प्रा. भगवानराव मस्के, आनंद ठोंबरे, भगवान गायकवाड आणि किसन मारकड यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बालाजी किरवले यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक युवकांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची प्रेरणा मिळणार असून, "परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश निश्चित मिळते," हा संदेश त्यांच्या यशोगाथेतून अधोरेखित झाला आहे.
What's Your Reaction?
Like
5
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
1
Sad
0
Wow
2