संत शिरोमणी नामदेव महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; हिंगोलीत भक्तिमय रिंगण सोहळा उत्साहात

संत शिरोमणी नामदेव महाराजांची पालखी नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून हिंगोलीतील रामलीला मैदानावर भव्य रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. नगरपरिषदेतर्फे वारकरी व भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

Jul 7, 2026 - 16:39
 0  43
संत शिरोमणी नामदेव महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; हिंगोलीत भक्तिमय रिंगण सोहळा उत्साहात
संत नामदेव महाराज पालखी, नरसी नामदेव, हिंगोली,

हिंगोली | प्रतिनिधी : भगवानराव मस्के

भगवद संप्रदायातील ज्येष्ठ संत संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी ५ जुलै रोजी त्यांच्या जन्मभूमी नरसी नामदेव (जि. हिंगोली) येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. ६ जुलै रोजी पालखीचे हिंगोली शहरात आगमन झाल्यानंतर रामलीला मैदानावर पारंपरिक रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

पालखीच्या स्वागतासाठी हिंगोली शहर भगव्या पताका, आकर्षक रांगोळ्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीने सजले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो वारकरी "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "विठ्ठल विठ्ठल" या नामघोषात तल्लीन झाले होते. रिंगण सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी पारंपरिक फुगड्या खेळत भक्तीचा अनोखा उत्सव साजरा केला.

यंदाच्या पालखी सोहळ्यात हिंगोली नगरपरिषदेतर्फे वारकरी व भाविकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच पालखी मार्गावर फराळाचे वाटप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

संत नामदेव महाराजांचा हा पालखी सोहळा दरवर्षी नरसी नामदेव येथून पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतो. सुमारे २६ दिवस चालणाऱ्या या यात्रेत हजारो वारकरी सहभागी होतात. मार्गातील आडगाव फाटा, हिंगोली रामलीला मैदान आणि इतर प्रमुख ठिकाणी रिंगण सोहळे व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

यावेळी हिंगोली नगराध्यक्षा सौ. सुरेखाताई बांगर, वस्ताद श्रीरामदादा बांगर, आमदार संतोषदादा बांगर यांच्या पत्नी गोदावरीताई बांगर, अशोकराव नाईक, नगरसेवक, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक उपस्थित होते.

भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवत संत शिरोमणी नामदेव महाराजांची पालखी पुढील मुक्कामाच्या दिशेने पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1