अंबाझरी आयुध निर्माणीत 10 हजार टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन; संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला मोठी चालना

नागपूर येथील अंबाझरी आयुध निर्माणीत 10 हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे संरक्षण, एरोस्पेस, विमाननिर्मिती आणि क्षेपणास्त्र क्षेत्रातील आयात अवलंबित्व कमी होऊन देशाच्या आत्मनिर्भरतेला मोठी चालना मिळणार आहे.

Jun 20, 2026 - 01:22
 0  3
अंबाझरी आयुध निर्माणीत 10 हजार टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन; संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला मोठी चालना
राजनाथ सिंह, अंबाझरी आयुध निर्माणी, अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस

प्रतिनिधी: सागर ठोकळे 

नागपूर : देशाच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला बळ देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची नागपुरात सुरुवात झाली आहे. यंत्र इंडिया लिमिटेडच्या अंबाझरी आयुध निर्माणीत 10 हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, देशाला भविष्यात संरक्षणदृष्ट्या सक्षम आणि सज्ज ठेवण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील अत्यावश्यक गरजांवर स्वतःचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पामुळे संरक्षण, एरोस्पेस, विमाननिर्मिती, क्षेपणास्त्र कार्यक्रम, रेल्वे आणि इतर धोरणात्मक क्षेत्रांसाठी आवश्यक उच्च दर्जाच्या अॅल्युमिनियम मिश्रधातूंच्या निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

ते म्हणाले की, हा प्रकल्प देशाचे आयातीवरील अवलंबित्व कमी करून स्वदेशी उत्पादन क्षमता वाढविणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मोठ्या आकाराचे आणि गुंतागुंतीचे अॅल्युमिनियम मिश्रधातू घटक देशातच तयार होणार असल्याने संरक्षण क्षेत्रातील पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल.

आधुनिक लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि अंतराळ मोहिमांसाठी हलके, मजबूत आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत टिकणारे धातू आवश्यक असतात. अशा धातूंच्या निर्मितीसाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी नमूद केले. तसेच ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये स्वदेशी संरक्षण उपकरणांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील वाढीचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, 2014 मध्ये देशांतर्गत संरक्षण उत्पादनाचे मूल्य सुमारे 46 हजार कोटी रुपये होते, तर 2025-26 मध्ये ते वाढून 1.78 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. संरक्षण निर्यातही 1 हजार कोटी रुपयांवरून 38 हजार 424 कोटी रुपयांपर्यंत वाढली असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील काही वर्षांत 3 लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन आणि 50 हजार कोटी रुपयांची संरक्षण निर्यात हे उद्दिष्ट वेळेपूर्वी गाठले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागपूर संरक्षण उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र बनेल – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असे संबोधले. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे भारत जागतिक संरक्षण उत्पादन क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून हा प्रकल्प नागपूर आणि विदर्भाला देशातील महत्त्वाचे ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब’ म्हणून विकसित करण्यास मदत करेल, असे ते म्हणाले.

फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनांच्या दिशेने देश वेगाने वाटचाल करत आहे. संरक्षण क्षेत्रातील भारताची वाढती ताकद जगभर मान्य होत असून, स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादनामुळे भारत आज जागतिक स्तरावर महत्त्वाचा संरक्षण उत्पादक देश म्हणून उदयास येत आहे.

या कार्यक्रमाला संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार, संयुक्त सचिव गरिमा भगत, यंत्र इंडिया लिमिटेडचे सीएमडी विजय कुमार अय्यर यांच्यासह संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाची माहिती देणारी ध्वनिचित्रफीतही सादर करण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0