बुवाबाजी प्रकरणावर माकपचे आंदोलन; ३९ आमदारांच्या राजीनाम्याची मागणी
माकपने बुवाबाजी प्रकरणावरून ३९ आमदारांच्या राजीनाम्याची मागणी करत ६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये आंदोलनाची हाक दिली आहे.
श्रीमती माधुरी अनिल वैद्य - नाशिक ब्यूरो
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (माकप) तर्फे राज्यातील कथित ‘बुवाबाजी’ प्रकरणावरून तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यात शहर व तालुका स्तरावर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.
माकपने आरोप केला आहे की, राज्यातील ३९ आमदार, काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी कथित भोंदू बाबा अशोक खरात यांच्या तंत्र-मंत्र व अंधश्रद्धेशी संबंधित कृतींमध्ये सहभागी झाले आहेत. या संदर्भात संबंधित आमदारांची यादी सरकारने तातडीने जाहीर करावी, त्यांचे राजीनामे घ्यावेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पक्षाने म्हटले आहे की, लोकप्रतिनिधींवर संविधानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची जबाबदारी आहे. मात्र, अशा प्रकारच्या कृतींमुळे अंधश्रद्धेला प्रोत्साहन मिळत असून सामान्य जनता भोंदूगिरीला बळी पडत आहे.
तसेच, या प्रकरणात काही महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याचा आरोप करत, हे व्हिडिओ तातडीने हटवावेत व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
माकपने पुढील मागण्या देखील मांडल्या आहेत:
प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरू करावा
जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी
सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धाजन्य जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी
याशिवाय सातपूर परिसरातील खंडणी प्रकरणात आरोपी रवींद्र एरंडे याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
माकप नेत्यांनी नागरिकांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या आंदोलनाचे आवाहन करताना माकपच्या वतीने डॉ. डी. एल. कराड, कॉम्रेड सिताराम ठोंबरे, ॲड. तानाजी जायभावे, सुनील मालुसरे, ॲड. वसुधा कराड, दिनेश सातभाई, डॉ. मिलिंद वाघ, कॉम्रेड सिंधू शार्दुल, एकनाथ इंगळे, दगडू व्हडगर, संतोष काकडे आणि तुकाराम सोनजे यांनी स्वाक्षरी केली आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0