दुष्काळग्रस्त ३५ कुटुंबांना किराणा किटचे वाटप; कस्तुराई बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम
शेगाव तालुक्यातील जलंब येथे कस्तुराई बहुउद्देशीय संस्था, युवा विकास संस्था आणि महिला पतंजलीच्या संयुक्त विद्यमाने ३५ गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप.
बुलढाणा प्रतिनिधी : महेंद्र मिश्रा
शेगाव : दुष्काळग्रस्त परिस्थितीत गरजू कुटुंबांना आधार देण्यासाठी शेगावमधील योगसाधिकांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. कस्तुराई बहुउद्देशीय संस्था, शेगाव युवा विकास बहुउद्देशीय संस्था, अमरावती आणि महिला पतंजली तहसील शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव तालुक्यातील जलंब गावात ३५ गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला १,५०० रुपये किमतीचे किराणा किट देण्यात आले. लोकवर्गणीतून उभारलेल्या निधीच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना मदत करण्यात आली.
लोकवर्गणीतून ४५ हजार रुपयांचा निधी संकलित
यावर्षीची परिस्थिती लक्षात घेऊन अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक कार्यासाठी निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. कस्तुराई फाउंडेशन आणि महिला पतंजली शेगावच्या अध्यक्षा कालिंदी असंबे यांनी पुढाकार घेत सुमारे ४५ हजार रुपयांची लोकवर्गणी जमा केली.
या निधी संकलनात शेगावमधील अनेक बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त योगदान दिले. तसेच तहसीलदार प्रज्ञा काकडे, जिगाव प्रकल्पाच्या सीईओ कल्याणी यमाजी, महिला पतंजलीच्या सर्व सदस्या आणि युवा विकास संस्थेचे अध्यक्ष गोपाल जवळकर यांनीही या उपक्रमाला सहकार्य केले.
सेवाभावातून जपली सामाजिक बांधिलकी
'मदतीचा हात छोटा असला, तरी त्यातून मिळणारा आधार खूप मोठा असतो. सेवाभाव हाच खरा योग आणि माणुसकी हाच खरा धर्म,' या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करणाऱ्या कुटुंबांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. महिलांनी एकत्र येऊन लोकवर्गणीच्या माध्यमातून गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवून सामाजिक एकतेचा आदर्श निर्माण केला.
अनेक योगसाधिकांचे सहकार्य
या सेवा कार्यासाठी श्रीकृष्ण असंबे, रामहरी निकम, ज्ञानू दुटे, प्रभुदास देवचे, अर्चना जोशी, सुनीता भिसे, सुनीता काकड, संगीता पाटील, रश्मी संघानी यांच्यासह अनेक योगसाधिकांनी सहकार्य केले.
गरजू कुटुंबांना मदतीचा आधार देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि महिला सहभागाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.