तुकाई उपसा जलसिंचन योजनेची कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करा; भैरवनाथ योजनेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा जलसिंचन योजनेची प्रलंबित कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ द्यावा, तसेच भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने सादर करावा, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
मुंबई प्रतिनिधी सागर ठोकळे, दि. १७ : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी तुकाई उपसा जलसिंचन योजनेची सर्व प्रलंबित कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. तसेच मिरजगाव येथील भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
विधान भवनात प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत तुकाई आणि भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी दोन्ही योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेऊन विविध विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले.
प्रा. राम शिंदे म्हणाले की, तुकाई उपसा जलसिंचन योजनेची सर्व प्रलंबित कामे वन्यजीव विभागाच्या आवश्यक परवानग्यांसह १५ जुलैपूर्वी पूर्ण करावीत. त्याच कालावधीत या योजनेचा शुभारंभही व्हावा. कुकडी धरणातील पाण्याचा लाभ या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
बैठकीत तुकाई उपसा सिंचन योजनेच्या आर्थिक आणि भौतिक प्रगतीचा तसेच उर्वरित कामांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. विद्युत, यांत्रिकी आणि स्थापत्य विभागांच्या कामांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
कर्जत तालुक्यातील १९ गावांना पिण्याच्या पाण्यासह सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची असल्याचे नमूद करत प्रा. शिंदे म्हणाले की, कुकडी डाव्या कालव्यातून पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था या प्रकल्पात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रकल्पाकडे विशेष लक्ष असून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून प्रकल्पाची कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत.
तुकाई उपसा सिंचन योजनेचे एकूण काम सध्या सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. पंपगृह आणि उर्ध्वगामी नलिकेची कामे सुमारे ९८ टक्के पूर्ण झाली असून वितरण प्रणालीची कामे ७२ टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
दरम्यान, मिरजगाव परिसरातील भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीना कालव्यातून पाणी उपसा करून १२ बंधारे भरण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत पंपगृह, उर्ध्वगामी वाहिन्या, वितरण वाहिन्या, वितरण कुंड, सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प तसेच विद्युत पुरवठा यंत्रणा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जनहिताच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची असून तिचे सर्वेक्षण, संकल्पन, आरेखन आणि सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून परिपूर्ण प्रस्ताव ऑगस्ट अखेरपर्यंत मंजुरीसाठी सादर करावा, असे निर्देश प्रा. राम शिंदे आणि मंत्री संजय राठोड यांनी दिले.
बैठकीस जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, पुणे वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक केशव वाबळे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्य अभियंता नितीन दुसाने, अधीक्षक अभियंता धनंजय दाहेदार, अधीक्षक अभियंता हरिभाऊ गिते, कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे, कार्यकारी अभियंता डी. वाय. गुळूमकर, कार्यकारी अभियंता सु. वि. गांगुर्डे तसेच वरिष्ठ अधिकारी आणि मिरजगावचे सरपंच नितीन खेतमाळीस उपस्थित होते.
स्त्रोत :
महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय / जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0