एल निनोच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांना चारा नियोजनाचे आवाहन; दुग्धोत्पादनावर परिणाम टाळण्यासाठी आतापासूनच तयारी करा
एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे राज्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी सर्व पशुपालकांनी आतापासूनच चारा पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
एल निनोच्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात राज्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पशुपालकांनी आतापासूनच चारा पिकांचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी केले आहे.
हवामानातील बदल आणि एल निनोच्या परिणामामुळे पावसाचे प्रमाण व वितरण प्रभावित होण्याची शक्यता आहे. यामुळे हिरवा चारा, वैरण आणि पशुखाद्याच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. परिणामी पशुधनाचे आरोग्य, दूध उत्पादन तसेच पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या उपलब्ध जमिनीवर विविध चारा पिकांची लागवड, चारा साठवणूक, सायलेज निर्मिती तसेच चारा बँक उभारणीसारख्या उपाययोजनांचे नियोजन करावे, असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले.
पशुसंवर्धन विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात असून, पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी व विभागीय कार्यालयांशी संपर्क साधून चारा व्यवस्थापनाबाबत आवश्यक माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील पशुधन व दुग्ध व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून चारा नियोजनाला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.
सहआयुक्त पशुसंवर्धन (पशुधन व नियोजन) यांनी ही माहिती दिली असून, सदर जनजागृतीपर संदेश स्थानिक, विभागीय तसेच राज्यस्तरीय प्रसारमाध्यमांतून व्यापक प्रमाणात प्रसारित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्त्रोत :
सहआयुक्त पशुसंवर्धन (पशुधन व नियोजन),
पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे – 411067.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0