जैविक शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे – संतोष मोरे

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीचा पोत खराब होत असल्याने शेतकऱ्यांनी जैविक शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी संतोष मोरे यांनी खुपिरे येथील लोकसंवाद कार्यक्रमात केले.

Sep 25, 2026 - 04:52
 0  5
जैविक शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे – संतोष मोरे
जैविक शेती, नैसर्गिक शेती, संतोष मोरे, कोल्हापूर कृषी विभाग, खुपिरे लोकसंवाद, शेतकरी योजना, महाडीबीटी, कृषी योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, कृषी प्रक्रिया उद्योग, पीएमएफएमई योजना, शेतकरी गट, करवीर तालुका, पाणी फाउंडेशन, उमेद अभियान

प्रतिनिधी : उमेश जाधव 

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीचा पोत खराब; कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. २४ (जिमाका) : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे सध्या शेतीतील मातीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अनावश्यक वापर टाळून जैविक शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी संतोष मोरे यांनी केले.

शासनाच्या ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत मौजे खुपिरे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध कृषी योजना, शेतकरी अपघात विमा, कृषी प्रक्रिया उद्योग तसेच नैसर्गिक शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

महाडीबीटीवरील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

संतोष मोरे म्हणाले की, महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागासाठी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत साधारणतः १०० हून अधिक योजना कार्यान्वित आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या गरजेनुसार या योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार त्यांचा लाभ घ्यावा.

कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांसाठी शासनाच्या योजनांचा उपयोग करून शेती अधिक शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती

सहाय्यक कृषी अधिकारी माधुरी पाटील-निकम यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत माहिती दिली. या योजनेंतर्गत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंत मदत, तर अपघातग्रस्त झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत मदत मिळू शकते, अशी माहिती त्यांनी दिली.

शेतकऱ्यांनी संबंधित योजनांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह पात्रतेनुसार लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

शेतीसोबत कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्याचे आवाहन

जिल्हा संसाधन व्यक्ती रवींद्र शिरोळकर यांनी शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्याकडे वळावे, असे आवाहन केले.

कृषी विभागामार्फत विविध योजनांसाठी साधारणतः ३५ ते ६० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कृषीमालावर प्रक्रिया करणारे लघुउद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.

तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता, तांत्रिक बाबी आणि उद्योग उभारणीसंदर्भातील मार्गदर्शन देण्यात येते. याशिवाय शेतकऱ्यांसाठी तीन दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

नैसर्गिक शेती अभियानासाठी पथनाट्यातून जनजागृती

कार्यक्रमादरम्यान खुपिरे येथील माऊली शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने विविध प्रबोधनात्मक पथनाट्ये सादर केली. पथनाट्याच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचे महत्त्व आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली.

करवीर तालुक्यात महिला व पुरुषांचे मिळून सुमारे ९६ शेतकरी गट कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

विविध मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास माहिती अधिकारी फारुख बागवान, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीपती माधुरी पाटील-निकम, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक (उपजीविका) प्रकाश लाड, जिल्हा संसाधन व्यक्ती रवींद्र शिरोळकर आणि पाणी फाउंडेशनचे फिल्ड ऑफिसर ओंकार सुर्वे उपस्थित होते.

यावेळी माऊली शेतकरी गटाचे अध्यक्ष संजय पाटील, खुपिरेच्या कृषी सहाय्यक उर्मिला सरनाईक, पूजा खोत, दामू दाते, सतीश शेंडगे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

‘लोकसंवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जैविक व नैसर्गिक शेती, कृषी विभागाच्या विविध योजना, विमा संरक्षण तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांच्या संधींबाबत माहिती देण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.