दिवंगत अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकजुटीने काम करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
दिवंगत अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
प्रतिनिधी : रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहराशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. शहराच्या विकासासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन विकासाची दिशा दिली. त्यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे राजकीय आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करावे, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचा आणि प्रलंबित प्रश्नांचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात घेतला. यावेळी त्यांनी शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विकासकामांना गती देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
या बैठकीस महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव राजेश देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
१९ विविध क्षेत्रांतील विकासकामांचे सादरीकरण
बैठकीदरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील पाणीपुरवठा, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक विकास, औद्योगिक विकास यांसह सुमारे १९ विविध क्षेत्रांतील विकासकामांचे सादरीकरण केले.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वेगाने वाढत असून, आगामी काळातील नागरीकरण आणि लोकसंख्येचा वाढता भार लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन करणे आवश्यक आहे. भविष्यातील गरजांचा विचार करून विकास प्रकल्पांची आखणी करावी, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींवर तातडीने उपाययोजना करा
शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न बैठकीत विशेष चर्चेचा विषय ठरला. कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, गढूळ पाणी येणे तसेच अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागणे, अशा तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका प्रशासनाने आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे. पाण्याचे उपलब्ध स्रोत, वितरण व्यवस्था आणि पर्यायी उपाययोजना यांचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
तसेच राज्यातील काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास पिंपरी-चिंचवड शहराकडे स्थलांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत वाढणारी लोकसंख्या आणि नागरी सुविधांवरील संभाव्य ताण लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक तयारी ठेवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यावर भर
मोशी कचरा डेपो येथे घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी होती. भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याची आवश्यकता असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला चांगले यश मिळाले असले, तरी त्यावर समाधान न मानता शहरातील स्वच्छता, कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया आणि विल्हेवाट याबाबत अधिक काटेकोरपणे काम करावे, असे त्यांनी प्रशासनाला सूचित केले.
प्रदूषण आणि वाहतूक समस्यांवरही लक्ष
शहराच्या वाढत्या विस्तारासोबतच प्रदूषण आणि वाहतूक कोंडी या समस्या गंभीर होत आहेत. या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असून, नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड शहराचा नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक विकास साधताना पाणीपुरवठा, पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक या मूलभूत विषयांना प्राधान्य द्यावे. विकासकामांचा केवळ आढावा न घेता त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि नियमित देखरेख करावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
दिवंगत अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेने एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. शहराचा विकास हाच केंद्रबिंदू ठेवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तत्पर राहावे, असा संदेश या आढावा बैठकीतून त्यांनी दिला.