अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांना ‘संत रोहिदास’ यांचे नाव; STEP प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ
महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण करण्यात आले. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते STEP प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. या टप्प्यात २६,५२० प्रशिक्षण प्रवेश क्षमता असून १८,२६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
तिसऱ्या टप्प्यात २६,५२० प्रशिक्षण प्रवेश क्षमता; आतापर्यंत १८,२६६ प्रशिक्षणार्थी दाखल
मुंबई, दि. २३ : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमाचे आता ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण करण्यात आले आहे. उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा आणि रोजगाराच्या नव्या संधी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या STEP (Short Term Employability Program) कार्यक्रमाचा विस्तार करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील युवकांसाठी एकूण २६,५२० प्रशिक्षण प्रवेश क्षमता उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत १८,२६६ प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे.
उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षण
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार आयटीआयमधील विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी हे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहेत. केवळ पदवी शिक्षण घेणे पुरेसे नसून त्यासोबत कौशल्य विकास आणि कौशल्यवृद्धी करणेही आवश्यक आहे. यामुळे युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण किंवा नोकरी करत असतानाही प्रशिक्षण घेता यावे, यासाठी दोन, तीन किंवा चार तासांचे प्रमाणित कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार असून, त्यांना रोजगाराच्या क्षेत्रात अधिक सक्षमपणे प्रवेश करता येईल.
आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांचा समावेश
बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात उद्योगांच्या गरजांनुसार आधुनिक आणि रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये STEP अर्थात अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
या कार्यक्रमांत पारंपरिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसोबत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, HVAC आणि सेमीकंडक्टर यांसारख्या क्षेत्रांत प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे युवकांना भविष्यातील रोजगार बाजारपेठेच्या गरजांनुसार कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात ५१ हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी
STEP कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. या टप्प्यात राज्यातील ४१४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि १२२ शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्रांचा समावेश करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात एकूण १,७६६ प्रशिक्षण तुकड्या सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये ५१,०४२ प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला, तर ३७,९८१ प्रशिक्षणार्थींचे मूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाचा पुढील टप्प्यांमध्ये विस्तार करण्यात आला.
दुसऱ्या टप्प्यात १,८४४ प्रशिक्षणार्थी
STEP कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षणासाठी जिल्हा नियोजन निधीचा वापर करण्यात आला. या टप्प्यात एकूण ८८ प्रशिक्षण तुकड्यांना मंजुरी देण्यात आली असून, १,८४४ प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला आहे. यापैकी ५९ प्रशिक्षण तुकड्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यात ८८४ प्रशिक्षण तुकड्या
कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ५६ शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्रांमधील ६७ प्रशिक्षण तुकड्या आणि ३४६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ८१७ प्रशिक्षण तुकड्या अशा एकूण ८८४ प्रशिक्षण तुकड्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
या टप्प्यासाठी २६,५२० प्रशिक्षण प्रवेश क्षमता उपलब्ध असून, आतापर्यंत १८,२६६ प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी दक्ष (DAKSH) निधीतून तरतूद करण्यात येणार असून, प्रशिक्षणार्थींची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर दक्ष प्रकल्पांतर्गत निधीची मागणी केली जाणार आहे.
महिलांसाठी विशेष कौशल्य अभ्यासक्रम
महिलांच्या कौशल्य विकासासाठीही STEP कार्यक्रमांतर्गत विशेष अल्पमुदतीचे अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात २६० प्रशिक्षण तुकड्यांच्या माध्यमातून ७,२३४ महिला प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
यामध्ये सेमीकंडक्टर टेक्निशियन, ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि ब्युटी थेरपिस्ट यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासह रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून प्रत्यक्ष कामाचा अनुभव द्या – मनीषा वर्मा
अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी प्रशिक्षणार्थींना पहिल्या दिवसापासून कच्च्या मालासह प्रत्यक्ष हाताळणीचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला. प्रशिक्षणासाठी आवश्यक कच्चा माल आणि सुविधा यांची कमतरता भासू नये, याची प्रत्येक प्राचार्याने दक्षता घ्यावी, असे त्यांनी निर्देश दिले.
राज्य शासन हा कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षणार्थींनी संबंधित कौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवावे आणि त्यांना उत्कृष्ट प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळावे, यासाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणाच्या सुरुवातीपासून देणे आवश्यक आहे. आयटीआयचा ब्रँड अधिक उंचावण्यासाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि उद्योगाभिमुख शिक्षणावर भर देण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या शुभारंभावेळी अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त डॉ. अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी तसेच ४०० आयटीआयचे प्राचार्य ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
पारंपरिक कौशल्य प्रशिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांचा कौशल्य विकास साधणे आणि उद्योगांच्या गरजांनुसार कुशल मनुष्यबळ तयार करणे हा STEP कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे राज्यातील युवकांच्या रोजगारक्षमतेला चालना मिळून रोजगार व स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात नवी दारे खुली होतील, असा विश्वास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.