ऊसतोड कामगारांसोबत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी साजरी केली दिवाळी

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला मतदारसंघातील सोनके येथे ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. माता-भगिनींना भाऊबीज आणि लहान मुलांना नवीन कपड्यांचे वाटप करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

ऊसतोड कामगारांसोबत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी साजरी केली दिवाळी
जयकुमार गोरे, ऊसतोड कामगार दिवाळी, सोनके, सांगोला, सोलापूर बातम्या, ऊसतोड कामगार कुटुंब, भाऊबीज वाटप, नवीन कपडे वाटप, ग्रामविकास मंत्री

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

सोनके येथे ऊसतोड कामगार कुटुंबीयांशी साधला संवाद; माता-भगिनींना भाऊबीज, चिमुकल्यांना नवीन कपड्यांचे वाटप

सोलापूर, दि. ९ : राज्यात दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांनाही दिवाळीचा आनंद अनुभवता यावा, या उद्देशाने ग्रामविकास व पंचायतराजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील सोनके येथे ऊसतोड कामगार बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.

यावेळी त्यांनी ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. ऊसतोड कामगार माता-भगिनींना भाऊबीज देऊन आपुलकी व्यक्त केली, तर चिमुकल्या मुलांना नवीन कपड्यांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.

ऊसतोड कामगार कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मंत्र्याने दिवाळीतील एक दिवस गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोनके येथे ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांसोबत सणाचा आनंद वाटून घेतला.

यावेळी त्यांनी कामगार बांधवांशी तसेच त्यांच्या लहान मुलांशी संवाद साधला. त्यांच्या राहणीमानाबाबत, अडचणींबाबत आणि अपेक्षांबाबत माहिती घेतली. माता-भगिनींना भाऊबीज देऊन त्यांच्याप्रती बंधुभाव व्यक्त केला. तसेच लहान मुलांना नवीन कपडे देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

कष्टकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांच्यापर्यंत विविध माध्यमांतून मदत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

या मदतकार्यात सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे. या सर्व प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देऊन जास्तीत जास्त गरजू शेतकरी आणि शेतमजूर बांधवांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक (आबा) साळुंखे-पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत, उल्हासदादा धायगुडे, बाळासाहेब एरंडे, माऊलीभाऊ हळनवर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, मान्यवर, प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.