आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसेस सज्ज; ग्रुप बुकिंगवर गावातून थेट पंढरपूर सेवा – प्रताप सरनाईक

आषाढी यात्रेनिमित्त राज्य परिवहन महामंडळाने यंदा ५,५०० विशेष बसेसची व्यवस्था केली आहे. ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी ग्रुप बुकिंग केल्यास राज्यातील कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष एसटी बस उपलब्ध होणार आहे. यात्रेदरम्यान वारकऱ्यांसाठी चार तात्पुरती बसस्थानके, विविध सुविधा आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Jul 13, 2026 - 00:13
 0  12
आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसेस सज्ज; ग्रुप बुकिंगवर गावातून थेट पंढरपूर सेवा – प्रताप सरनाईक
आषाढी यात्रा 2026, पंढरपूर, एसटी महामंडळ, प्रताप सरनाईक

पंढरपूर प्रतिनिधी :  जगदीश पवार 

दि. १२ जुलै २०२६ पंढरपूर: आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा ५ हजार ५०० विशेष बसेस चालविण्याचे नियोजन केले आहे. तसेच ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी ग्रुप बुकिंग केल्यास राज्यातील कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

आषाढी यात्रेच्या नियोजनासंदर्भात चंद्रभागा बसस्थानक, पंढरपूर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके तसेच एसटी महामंडळाचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, विशेष बस सेवेमध्ये शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत. 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर 'महिला सन्मान योजना' अंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यात्रेच्या काळात पंढरपूरातील सर्व बसस्थानकांवर उभ्या असलेल्या बसेसची अंतर्गत व बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण, "आषाढी यात्रेसाठी विशेष बस सेवा" असे दर्शनी फलक लावणे, तसेच चालक व वाहकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परतीच्या प्रवासादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन मार्गनिहाय स्वतंत्र रांगा तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने प्रवाशांना बसेसमध्ये प्रवेश देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने ५,१४५ विशेष बसेस चालवून तब्बल २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा त्यापेक्षाही अधिक प्रभावी आणि सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून, एकादशीनंतर परतीच्या प्रवासासाठी वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत.

वारकरी भाविकांच्या सोयीसाठी चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) येथे चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. या बसस्थानकांवर शुद्ध पिण्याचे पाणी, सुलभ शौचालये, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

वारी कालावधीत रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या एसटी महामंडळाच्या सुमारे १३ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

दरम्यान, आषाढी शुद्ध एकादशी २५ जुलै २०२६ रोजी होत असून, दरवर्षी सुमारे १८ ते २० लाख वारकरी पंढरपुरात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देगाव येथील भीमा तात्पुरत्या बसस्थानकाची पाहणी करून तेथील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1