मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; ‘पंढरपूर कॉरिडॉर’ अडीच वर्षांत पूर्ण करण्याची ग्वाही

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी ‘पंढरपूर कॉरिडॉर’ अडीच वर्षांत पूर्ण करण्याची ग्वाही देत वारकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Jul 26, 2026 - 03:08
 0  3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; ‘पंढरपूर कॉरिडॉर’ अडीच वर्षांत पूर्ण करण्याची ग्वाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय

प्रतिनिधी देवानंद शिंदे 

पंढरपूर, दि. २५ : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी ‘पंढरपूर कॉरिडॉर’ प्रकल्प अडीच वर्षांत पूर्ण करण्याची ग्वाही देत, कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले.

महापूजेनंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मंदिर परिसराचा नियोजित विकास करणे अत्यावश्यक झाले आहे. कॉरिडॉर प्रकल्पामुळे भाविकांना अधिक सुविधा मिळतील, स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे उपलब्ध होतील आणि भाडेकरूंसाठीही योग्य व्यवस्था करण्यात येईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लाखो भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन व्यवस्था उपलब्ध होईल.

मुख्यमंत्री म्हणाले की, यंदाच्या आषाढी वारीत दर्शनासाठी २५ किलोमीटरहून अधिक लांबीची रांग लागली होती. दर्शनासाठी अनेक तास प्रतीक्षा करूनही वारकरी विठ्ठलनामाच्या गजरात आनंदाने दर्शन घेत होते. यंदा चंद्रभागा नदीचे पाणी आणि वाळवंट परिसर स्वच्छ ठेवण्यात प्रशासनाला यश आले असून, यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हा प्रशासन आणि स्वच्छतादूतांचे विशेष योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, वारकरी म्हणजेच विठुरायाचे रूप आहे. त्यामुळे वारकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा आहे. याच भावनेतून राज्य शासनाने ५६ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय, शेतकऱ्यांना मोफत वीज आणि थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्र्यांनी मंदिर विकासासाठी सातत्याने निधी आणि पाठबळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. दर्शन रांगेतील सुविधा आणि नियोजनामुळे लाखो वारकऱ्यांना सुलभ दर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी धाराशिव जिल्ह्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माधव माने आणि सौ. प्रभावती माने या मानाच्या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना एसटी महामंडळाचा वर्षभरासाठी मोफत प्रवास पास प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. पाणी संवर्धन, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी आणि वृक्षसंवर्धनासाठी जनजागृती करणाऱ्या दिंड्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर, द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जालना आणि तृतीय क्रमांक गोऱ्हेकर संस्था, आळंदी देवाची यांना पुरस्कार आणि धनादेश प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्यासह मंदिर समितीचे सदस्य, अधिकारी आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0