छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’त नागरिकांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे वडाळा येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’त नागरिकांनी महसूल विभागाच्या विविध सेवा आणि शासकीय योजनांचा लाभ घेतला. १९ शासकीय विभागांनी स्टॉलद्वारे मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून दिल्या.

Jul 23, 2026 - 22:05
 0  6
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’त नागरिकांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर, महसूल समाधान

मुंबई | प्रतिनिधी नरेश शिंदे 

राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे वडाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले. या शिबिरात नागरिकांनी महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ घेतला, तसेच अनेक शासकीय योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभही मिळवला.

या कार्यक्रमाला आमदार कालिदास कोळंबकर, आमदार डॉ. मनिषा कायंदे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात उपस्थित होते.

नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचणार

यावेळी बोलताना आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितले की, अशा महसूल समाधान शिबिरांमुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी होत असून, महसूल प्रशासन अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनत आहे.

शासनावरील विश्वास अधिक दृढ होणार

आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी सांगितले की, डिजिटल सेवा, महसूल संहितेतील नव्या तरतुदी आणि विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचत असल्याने शासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल.

१९ शासकीय विभागांचे स्टॉल

शिबिरात १९ शासकीय विभागांनी माहिती व सेवा केंद्रे (स्टॉल) उभारून नागरिकांना विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्जांची तत्परतेने छाननी करून अनेक प्रकरणांमध्ये तातडीने सेवा दिल्या.

विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ

शिबिरादरम्यान अनेक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. तसेच महसूल विभागाशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले.

कार्यक्रमासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि शासनाच्या विविध विभागांचे सहकार्य लाभले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी प्रास्ताविकात सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0