सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय व कॅथलॅब सेवांचे तातडीने लोकार्पण करा; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
सातारा जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील एमआरआय आणि कॅथलॅब सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश.
प्रतिनिधी: उमेश जाधव
मुंबई, दि. २९ : सातारा जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय व कॅथलॅब सुविधा तातडीने कार्यान्वित करून त्यांचे लोकार्पण करण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
मंत्रालयात मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमधील विकासकामे, उपलब्ध मनुष्यबळ तसेच वैद्यकीय सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर, सहसंचालक (रुग्णालय) डॉ. सुनिता गोल्हाईत, पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार, उपसचिव दीपक केंद्रे, सातारा जिल्हा शल्यचिकित्सक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
एमआरआय व कॅथलॅब सुविधा तातडीने सुरू करण्याचे निर्देश
सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय आणि कॅथलॅब सुविधा नागरिकांच्या सेवेसाठी तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना मंत्री आबिटकर यांनी दिल्या. या सुविधा सुरू झाल्यानंतर रुग्णांना अत्याधुनिक निदान आणि हृदयविकाराशी संबंधित उपचार सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सुमारे १,४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदांवर ऑगस्ट महिन्यात नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री आबिटकर यांनी दिली. या नियुक्त्यांमुळे शासकीय रुग्णालयांमधील मनुष्यबळ वाढून आरोग्य सेवा अधिक सक्षम, प्रभावी आणि गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवून अधिकाधिक नागरिकांना योजनेचा लाभ मिळेल, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही मंत्री आबिटकर यांनी दिल्या.
सातारा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना आरोग्य सेवा आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी द्याव्यात. सुरू असलेल्या विकासकामांची वस्तुस्थिती तपासून त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
प्रलंबित आरोग्यविषयक कामांना गती देण्याचे आवाहन
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय, कॅथलॅब आणि आयुष रुग्णालयाशी संबंधित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही राज्य शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व प्रलंबित आरोग्यविषयक विकासकामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0