माथाडी कामगारांच्या हितासाठी ५० किलो वजन नियमाची कठोर अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ५० किलो वजन नियमाची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. वाशी एपीएमसी मार्केटच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुनर्विकासासह कामगारांच्या घरकुल, वेतन, शिक्षण व कल्याणकारी योजनांवर भर देण्यात आला.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
मुंबई : माथाडी कामगारांच्या कामाचे महत्त्व तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाच्या काळातही कायम राहणार असून, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. हमालीच्या कामासाठी निर्धारित असलेल्या ५० किलो वजनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शासनाकडून कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
वाशी येथील एपीएमसी बाजारपेठेच्या पुनर्विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण बाजारपेठेचा अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर पुनर्विकास करण्याचा विश्वास व्यक्त केला. बाजारपेठेच्या विकासासोबतच तेथील माथाडी कामगारांच्या हिताचेही संरक्षण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
माथाडी कायद्याचे संरक्षण आवश्यक – आमदार शशिकांत शिंदे
आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी चळवळीची एकता आणि माथाडी कामगारांना मिळालेले कायदेशीर संरक्षण कायम ठेवण्याची गरज व्यक्त केली. माथाडी कायद्याला कोणत्याही प्रकारे धक्का लागू न देणे ही सर्व कामगार प्रतिनिधींची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
असंघटित कामगारांना हक्काचे वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि बोनस मिळवून देणाऱ्या या ऐतिहासिक कायद्याची मूळ चौकट कायम ठेवून आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच माथाडी चळवळीला बदनाम करणाऱ्या अनधिकृत टोळ्यांवर प्रतिबंध घालून प्रत्यक्ष कष्ट करणाऱ्या कामगारांचे हित जपले पाहिजे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या पोत्यांवर कारवाईची मागणी
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मानकांनुसार हमाली करणाऱ्या कामगारांसाठी ५० किलोपेक्षा अधिक वजनाचे ओझे नसावे, असा नियम असतानाही बाजारात अधिक वजनाची पोती आणली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच वडाळा येथील माथाडी कामगारांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून कामगारांना हक्काची घरे उपलब्ध करून देणे, वाशी एपीएमसी मार्केटचा कालबद्ध पद्धतीने पुनर्विकास करताना नोंदणीकृत माथाडी कामगारांना निवासी व व्यावसायिक गाळे उपलब्ध करून देणे, तसेच कामगारांच्या मुलांना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.
वडाळा गृहप्रकल्पाबाबत रुणवाल ग्रुपचे सादरीकरण
कार्यक्रमाच्या प्रारंभी रुणवाल ग्रुपचे उपाध्यक्ष महेश खेतपाल यांनी वडाळा येथील माथाडी कामगारांच्या गृहप्रकल्पासंदर्भात सादरीकरण केले. माथाडी कामगारांच्या हितासाठी रुणवाल ग्रुप सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश सुपूर्द
कार्यक्रमादरम्यान आमदार निरंजन डावखरे यांनी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात जमा करण्याकरिता धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी नगरसेवक भरत चव्हाण आणि ओंकार चव्हाण उपस्थित होते.
गुणवंत माथाडी कामगारांचा सन्मान
कार्यक्रमाच्या समारोपावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत माथाडी कामगारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठीच्या योजना आणि बाजारपेठांच्या विकासात कामगारांचा सहभाग यावर कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0