अकोला अधिवेशनातून पत्रकारांचा बुलंद आवाज; ‘लाडका पत्रकार’ योजनेसह १३ महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर
अकोला येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात पत्रकारांच्या कल्याणासाठी ‘लाडका पत्रकार’ योजना सुरू करण्यासह पत्रकार संरक्षण कायदा, घरकुल, विमा, रेल्वे पास, एसटी प्रवास सुविधा अशा १३ महत्त्वपूर्ण ठरावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. राज्यभरातील पत्रकारांनी पत्रकारांच्या हक्कांसाठी एकजूट दर्शवत शासनाकडे तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.
नाशिक ब्यूरो
अकोला :राज्यातील पत्रकारांच्या हक्क, सुरक्षा आणि सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी ऐतिहासिक मानल्या जाणाऱ्या मागण्यांना अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात जोरदार पाठिंबा मिळाला. अधिवेशनात ‘लाडक्या बहिणीनंतर आता लाडका पत्रकार योजना सुरू करा’ या मागणीसह पत्रकारांच्या हिताचे १३ महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
हॉटेल कृष्णा इम्पेरियल येथे पार पडलेल्या या अधिवेशनाला राज्यभरातील पत्रकार, संपादक, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'लाडका पत्रकार' योजनेची एकमुखी मागणी
अधिवेशनातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे पत्रकारांसाठी स्वतंत्र 'लाडका पत्रकार योजना' सुरू करण्याचा ठराव. हा ठराव प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी मांडला. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून कठीण परिस्थितीत समाजासाठी कार्य करतात. त्यामुळे त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक सुरक्षेसाठी राज्य शासनाने स्वतंत्र कल्याणकारी योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली.
ठरावाला सभागृहातील पत्रकारांनी टाळ्यांच्या कडकडाटात पाठिंबा देत सर्वानुमते मंजुरी दिली.
पत्रकार संरक्षण कायद्यावर भर
अधिवेशनात पत्रकारांवरील वाढते हल्ले, खोटे गुन्हे, धमक्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे आघात या विषयांवर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला. पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, हल्लेखोरांवर कठोर कारवाई आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
डॉ. विश्वासराव आरोटे यांचे मार्गदर्शन
मार्गदर्शन करताना डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले की, "पत्रकारिता अधिक सक्षम, निर्भय आणि निष्पक्ष राहणे ही काळाची गरज आहे. पत्रकारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य आणि जनहिताची भूमिका कायम ठेवावी. पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा उभारणे आवश्यक आहे."
निलेश सोमानी यांचे आवाहन
प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी यांनी पत्रकारिता ही समाजाप्रती असलेली जबाबदारी असल्याचे सांगत पत्रकारांनी सत्याची कास सोडू नये, पिवळ्या पत्रकारितेपासून दूर राहावे आणि सामाजिक बांधिलकी जपत काम करावे, असे आवाहन केले.
पत्रकारांच्या हितासाठी मंजूर झालेले १३ महत्त्वपूर्ण ठराव
अधिवेशनात पुढील महत्त्वपूर्ण मागण्यांना मंजुरी देण्यात आली:
पत्रकारांसाठी 'लाडका पत्रकार' योजना सुरू करणे.
पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी.
कोरोना काळापासून बंद असलेले रेल्वे पास पुन्हा सुरू करणे.
एसटीच्या वातानुकूलित बसमध्ये पत्रकारांना मोफत प्रवास सुविधा.
पत्रकारांसाठी घरकुल योजना लागू करणे.
आरोग्य विमा, अपघात विमा आणि निवृत्तीवेतन योजना सुरू करणे.
ग्रामीण पत्रकारांना अधिक अधिस्वीकृती देणे.
पत्रकार कल्याणकारी मंडळ आणि वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करणे.
अधिस्वीकृती प्रक्रियेतील निकषांचा पुनर्विचार करणे.
लघु वृत्तपत्रांना मुद्रण व कागदावरील जीएसटीमध्ये सवलत देणे.
शासनमान्य यादीबाहेरील वृत्तपत्रांनाही जाहिराती देणे.
ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधीच्या अटी शिथिल करणे.
पत्रकारांच्या पाल्यांसाठी शिक्षणात विशेष सवलती व आरक्षणाचा विचार करणे.
पुरस्कार वितरण आणि सत्कार
अधिवेशनात पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, आरोग्य पत्रकारिता पुरस्कार, तिसरा डोळा पत्रकारिता पुरस्कार, आदर्श पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
राज्यभरातून आलेल्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. अकोला जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे आणि त्यांच्या टीमचा यशस्वी आयोजनासाठी विशेष गौरव करण्यात आला.
राज्य सरकारकडे सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
अधिवेशनात मंजूर झालेले सर्व ठराव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून पत्रकारांच्या सन्मान, सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक कल्याणासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी राज्यभरातून उपस्थित पत्रकारांनी केली. 'लाडक्या बहिणीनंतर आता लाडका पत्रकार' योजना लागू करण्याचा आवाज अकोल्यातून संपूर्ण राज्यभर घुमला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0