पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ७० सायकलपटूंची इचलकरंजी–पंढरपूर सायकल वारी; ‘नशामुक्त अभियानाला’ही बळ
पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी इचलकरंजीतील ७० सायकलपटूंनी १६५ किमीची इचलकरंजी–पंढरपूर सायकल वारी यशस्वीपणे पूर्ण केली.
कोल्हापूर प्रतिनिधी : उमेश जाधव
इचलकरंजी | पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि ‘नशामुक्त अभियान’ यांचा प्रभावी संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने इचलकरंजी येथील रिंगण फिटनेस फाउंडेशनच्या ७० सायकलपटूंनी इचलकरंजी ते पंढरपूर असा सुमारे १६५ किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, व्यसनमुक्ती आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
शिवतीर्थ येथून पहाटे ५.३० वाजता सायकल वारीला प्रारंभ झाला. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष पंकज कोठारी, माजी अध्यक्ष प्रकाश रावळ, इचलकरंजी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच रिंगण फिटनेस फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन खोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या वारीला सुरुवात झाली.
इचलकरंजी–मिरज–सांगोला–पंढरपूर असा १६५ किलोमीटरचा प्रवास सायकलपटूंनी यशस्वीपणे पूर्ण केला. कडक उन्हाचा तडाखा, अधूनमधून वाहणारे वेगवान वारे आणि प्रदीर्घ अंतर अशा आव्हानांवर मात करत सहभागी सायकलपटूंनी "नशामुक्त जीवन – निरोगी जीवन" आणि पर्यावरण संरक्षण हा संदेश समाजापर्यंत पोहोचवला.
या सायकल वारीमध्ये ज्येष्ठ सायकलपटू कृष्णात गोंदुकुप्पे, शेखर पवार, नारायण जाधव, संतोष पाटील, अॅड. जिया शेख, शितल दुधाणे, वैशाली माळी, स्वप्निल मद्यामघोळ, किसन अक्कतंगेरहाळ यांच्यासह एकूण ७० सायकलपटूंनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
९० दिवसांत १०,१११ किलोमीटर सायकलिंगचा विक्रम
इचलकरंजी महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी कृष्णात गोंदुकुप्पे यांनी या उपक्रमादरम्यान उल्लेखनीय कामगिरी करत ९० दिवसांत तब्बल १०,१११ किलोमीटर सायकलिंग पूर्ण करण्याचा विक्रम केला. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी पंढरपूर चॅलेंज सायकल वारी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. राज्यभरातील सुमारे २,६०० सायकलपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवनशैली आणि व्यसनमुक्त जीवनाचा आदर्श आपल्या कृतीतून समाजासमोर ठेवणाऱ्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, पर्यावरण संरक्षण आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत सहभागी सायकलपटूंनी व्यक्त केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0