वाशिम जिल्हा होणार ‘मोतीबिंदूमुक्त’; जे.एम. फायनान्शियल फाउंडेशनसोबत शासनाचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वाशिम प्रशासन आणि जे.एम. फायनान्शियल फाउंडेशनमध्ये सामंजस्य करार झाला.
प्रतिनिधी : देवानंद शिंदे
मुंबई, दि. २१ : वाशिम जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देत जिल्ह्याला ‘मोतीबिंदूमुक्त’ करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम जिल्हा प्रशासन आणि जे.एम. फायनान्शियल फाउंडेशन यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
या करारावर वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जे.एम. फायनान्शियल फाउंडेशनच्या वतीने कार्यकारी संचालक पूजा दवे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’च्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ घडविण्याचे स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून पाहिले जात आहे, असे सांगत प्रशासनाच्या प्रयत्नांना जे.एम. फायनान्शियल फाउंडेशनसारख्या संस्थेची साथ मिळाल्यामुळे आरोग्यसेवेचे हे प्रयत्न अधिक व्यापक होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
शासनाच्या समांतर स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याऐवजी शासकीय यंत्रणेला बळकटी देण्याच्या फाउंडेशनच्या भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. वाशिममध्ये राबविण्यात येणारा हा उपक्रम भविष्यात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून राज्यातील इतर भागांमध्ये आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी एक मॉडेल ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
‘एकही गरजू व्यक्ती नेत्रसेवेपासून वंचित राहणार नाही’
जे.एम. फायनान्शियल फाउंडेशनचे अध्यक्ष निमेश कंपानी यांनी फाउंडेशनच्या भूमिकेबाबत माहिती देताना सांगितले की, शासनाशी स्पर्धा करण्याचा फाउंडेशनचा उद्देश नसून शासनासोबत समन्वयाने काम करण्याचा प्रयत्न आहे.
“वाशिममधील एकही गरजू व्यक्ती दर्जेदार नेत्रसेवेपासून वंचित राहू नये, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे कंपानी यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाचे समर्पण पाहून वाशिम जिल्ह्यातील नेत्रसेवा अधिक सक्षम करण्यावर फाउंडेशनने विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना नेत्रसेवेचा लाभ
या सामंजस्य करारामुळे वाशिम जिल्ह्यातील वाड्या-वस्त्या आणि ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना नेत्रतपासणी, आवश्यक शस्त्रक्रिया आणि आधुनिक उपचार सुविधा अधिक सुलभपणे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
जे.एम. फायनान्शियल फाउंडेशनकडून २०२६ ते २०३२ या कालावधीत जिल्ह्यात गुंतवणूक आणि सहकार्य केले जाणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पहिल्या वर्षी फाउंडेशनकडून दीड कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
आरोग्य यंत्रणा आधुनिक करण्यावर भर
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR)च्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक आधुनिक आणि सुसज्ज करण्यावर भर दिला जाणार आहे. याअंतर्गत जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांसाठी अद्ययावत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास करणे तसेच आपत्कालीन आरोग्य सुविधा बळकट करणे, या बाबींवर काम करण्यात येणार आहे.
वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील सध्याच्या नेत्रसेवेची स्थिती, आवश्यक उपाययोजना आणि या भागीदारीतून अपेक्षित परिणाम याबाबत माहिती दिली.
या उपक्रमामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर नेत्रतपासणी व उपचार उपलब्ध होण्यास मदत होणार असून, मोतीबिंदूच्या उपचारासाठी नागरिकांना अधिक सुलभ आरोग्य सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, जे.एम. फायनान्शियल फाउंडेशनचे अध्यक्ष निमेश कंपानी, जे.एम. फायनान्शियल होम लोन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शेठ, वाशिमचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पुरी आदी उपस्थित होते.
या सामंजस्य करारामुळे वाशिम जिल्ह्यातील नेत्रसेवा अधिक सक्षम करण्यासोबतच ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0