‘अमृत-2’ अंतर्गत सर्व कामे मार्च 2027 अखेर पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
नागपूर शहरातील ‘अमृत-2’ अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे मार्च 2027 अखेर गतीने आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पोहरा नदी पुनरुज्जीवन आणि सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटच्या कामांचा आढावा.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
नागपूर : ‘अमृत-2’ अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे मार्च 2027 अखेरपर्यंत गतीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर शहरातील ‘अमृत-2’ योजनेअंतर्गत सुरू असलेली विकासकामे तसेच पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन या विषयांचा आढावा घेण्यासाठी रामगिरी शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
रस्ते खोदकाम आणि पुनर्भरणाच्या कामांचा आढावा
बैठकीत ‘अमृत-2’ योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या रस्ते खोदकामानंतरच्या पुनर्भरणाच्या (Restoration) कामांचा आढावा घेण्यात आला. उपस्थित नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील रस्ते खोदकाम आणि पुनर्भरणाच्या कामांमुळे निर्माण झालेल्या समस्यांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडली.
रिंग रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांबाबतही यावेळी विविध मुद्दे मांडण्यात आले. आमदार प्रवीण दटके यांनी नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत मुद्दा उपस्थित केला. स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी वखरे यांनीही पावसाळ्यात नागरिकांना झालेल्या त्रासाची माहिती बैठकीत दिली.
रस्ते पुनर्भरणासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश
सिमेंटच्या रस्त्यांवर पुनर्भरण किंवा खड्डे बुजविताना कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये. त्यासाठी शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीचा सक्तीने अवलंब करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
भविष्यात शहरात रस्ते खोदकाम आणि त्यानंतरच्या पुनर्भरणाची प्रक्रिया अधिक सुसूत्र करण्यासाठी संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सर्व संबंधित विभागांनी योग्य समन्वयाने काम करावे. कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर सक्त कारवाई करण्यात यावी, अशी ताकीदही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आढावा
नागपूर महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे ‘अमृत-2’ योजनेतील विविध कामांसह पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन आणि पुनरुज्जीवन प्रकल्पाची सविस्तर माहिती बैठकीत दिली.
यावेळी पोहरा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सांडपाण्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट्स (STP) बाबतही माहिती देण्यात आली.
जयताळा आणि चिखली येथे एसटीपी
जयताळा येथे 10 एमएलडी क्षमतेचा, तर चिखली येथे 35 एमएलडी क्षमतेचा सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट (STP) उभारण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
तसेच चिंचभवन, बीडीपेठ आणि सोमलवाडा येथे पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहितीही महापालिका आयुक्तांनी दिली.
अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित
या बैठकीला आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी वखरे, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त अंकित, मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी आशा पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे, महापालिकेच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये, नगरसेवक तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘अमृत-2’ अंतर्गत सुरू असलेली कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासोबतच रस्ते खोदकामानंतरच्या पुनर्भरणाच्या कामांचा दर्जा, विभागांमधील समन्वय आणि पोहरा नदीच्या प्रदूषण निर्मूलनाला बैठकीत प्राधान्य देण्यात आले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1