मेडिकल-मेयोतील विकासकामांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; सर्पदंशग्रस्त बालिकेच्या प्रकृतीचीही घेतली चौकशी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील सुरू असलेल्या विकासकामांची व वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. मेडिकलमध्ये पीआयसीयू व्हेंटिलेटर युनिटचे लोकार्पण करून सर्पदंशग्रस्त बालिकेच्या प्रकृतीचीही चौकशी केली.

Aug 20, 2026 - 22:50
 0  10
मेडिकल-मेयोतील विकासकामांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; सर्पदंशग्रस्त बालिकेच्या प्रकृतीचीही घेतली चौकशी
देवेंद्र फडणवीस, मेडिकल नागपूर, मेयो नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर मेडिकल,

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

नागपूर, दि. २० : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांची आणि वैद्यकीय सुविधांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त करतानाच काही कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या बालिकेच्या प्रकृतीचीही चौकशी केली. नागपूर मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या या विद्यार्थिनीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेत तिच्या आईशी संवाद साधला. बालिकेची योग्य काळजी घेऊन आवश्यक उपचार करण्याच्या सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या.

मेडिकलमधील विकासकामांची पाहणी

नागपुरातील मेडिकल आणि मेयो ही दोन प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये असून, त्यांच्या विविध विकासकामांसाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांची प्रगती आणि रुग्णांसाठी निर्माण करण्यात येत असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही रुग्णालयांना भेट दिली.

मेडिकलमध्ये एनआयसी आणि पीआयसीयू विभागाची त्यांनी पाहणी केली. यावेळी पीआयसीयूमधील व्हेंटिलेटर युनिटचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर शस्त्रक्रियागृह आणि सर्जिकल आयसीयूचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. सुरू असलेल्या कामांची माहिती घेताना कामांचा वेग वाढवून ती निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी मेडिकलमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांची आणि वैद्यकीय सुविधांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

सर्पदंशग्रस्त बालिकेची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आदिवासी आश्रमशाळेत नुकतीच सर्पदंशाची घटना घडली होती. या घटनेतील एका विद्यार्थिनीला उपचारासाठी नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बालिकेची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच तिच्या आईशी संवाद साधून उपचाराबाबत माहिती जाणून घेतली. बालिकेच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक वैद्यकीय उपचार आणि योग्य काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या.

यावेळी उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, आमदार मोहन मते आणि नगरसेवक रितेश गावंडे उपस्थित होते.

मेयो रुग्णालयातील विकासकामांचीही पाहणी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात मेयो येथेही भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली.

मेयो रुग्णालयात सध्या विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून रुग्णालयातील कामांची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल ब्लॉक, सर्जिकल ब्लॉक आणि शस्त्रक्रियागृहाची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून विकासकामांची सद्यस्थिती जाणून घेतली.

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांसह अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांच्या निर्मितीबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. आतापर्यंत झालेल्या कामांबाबत समाधान व्यक्त करताना उर्वरित विकासकामांनाही गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मेडिकल आणि मेयो या दोन्ही प्रमुख शासकीय रुग्णालयांमधील पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा अधिक सक्षम झाल्यास नागपूरसह विदर्भातील रुग्णांना मोठा लाभ मिळणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.