आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवेचा वापर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णाची घेतली भेट
आषाढी वारीदरम्यान प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवेच्या माध्यमातून एका वारकऱ्याला पंढरपूरहून सोलापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानतळावर रुग्णाची भेट घेऊन उपचाराची माहिती घेतली.
प्रतिनिधी देवानंद शिंदे :
पंढरपूर, दि. २५ : आषाढी वारीच्या इतिहासात प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवेचा यशस्वी वापर करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथून विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या एका वारकऱ्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सद्वारे सोलापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानतळावर रुग्णाची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांना आवश्यक उपचार तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
माहितीनुसार, बालू आसाराम पडूळ (वय ५४, रा. छत्रपती संभाजीनगर) हे आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांना तातडीने तीन रस्ता परिसरातील अतिदक्षता उपचार कक्षात (आयसीयू) दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील तपासणीसाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
रुग्णालयात ईसीजीसह आवश्यक तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सद्वारे सोलापूरला हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे हृदयरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली.
सोलापूर विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्स दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णाची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचाराची माहिती घेत रुग्णाला सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आषाढी वारीदरम्यान लाखो भाविक पंढरपूर येथे दाखल होत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने यंदा प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे. या उपक्रमामुळे गंभीर रुग्णांना अल्पावधीत मोठ्या रुग्णालयात हलविणे शक्य होत असून, वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ही सेवा महत्त्वाची ठरत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1