अनंत चतुर्दशीसाठी गिरगाव चौपाटी सज्ज; BMC कडून प्रथमच व्यापक आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष कार्यरत

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सर्वंकष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमध्ये त्वरित समन्वय साधण्यासाठी प्रथमच व्यापक आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.

Sep 24, 2026 - 23:45
 0  6
अनंत चतुर्दशीसाठी गिरगाव चौपाटी सज्ज; BMC कडून प्रथमच व्यापक आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष कार्यरत
अनंत चतुर्दशी 2026, गिरगाव चौपाटी गणेश विसर्जन, स्वराज्यभूमी, BMC, मुंबई महानगरपालिका, आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष,

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मुंबई, दि. २४ सप्टेंबर : श्रीगणेशोत्सवाच्या अनंत चतुर्दशीदिनी म्हणजेच २५ सप्टेंबर २०२६ रोजी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे मोठ्या प्रमाणावर श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने विसर्जनासाठी आवश्यक सर्व नागरी सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची तयारी पूर्ण केली आहे.

यंदा स्वराज्यभूमी परिसरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित यंत्रणांमध्ये तातडीने समन्वय साधता यावा, यासाठी महानगरपालिकेकडून प्रथमच व्यापक स्वरूपात ‘आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष’ (Emergency Management Control Room) कार्यरत करण्यात आला आहे.

उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव आणि सहायक आयुक्त (डी विभाग) श्री. संतोष साळुंके यांच्या समन्वयाने स्वराज्यभूमी येथे हा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.

लाखो भाविकांसाठी विविध सुविधा

स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यामध्ये प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका सेवा, सुरक्षा व गर्दी व्यवस्थापन, तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी देश-विदेशातून भाविक, नागरिक आणि अभ्यासक येत असतात. त्यामुळे मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

आपत्कालीन कक्षात विविध यंत्रणांचे अधिकारी

आपत्कालीन परिस्थितीत तातडीने निर्णय घेऊन संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्षात विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

या कक्षामध्ये महानगरपालिका मुख्यालयाच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, BEST विद्युत पुरवठा विभाग, मुंबई पोलीस, मुंबई अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF) यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तसेच अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे हॅम रेडिओ चालकही समन्वयासाठी उपलब्ध राहणार आहेत.

संदेशवहन आणि तातडीच्या समन्वयासाठी नियंत्रण कक्षात भ्रमणध्वनी, डिजिटल मोबाईल रेडिओ (बिनतारी यंत्रणा) आणि हॅम रेडिओ यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

CCTV आणि ड्रोनद्वारे चौपाटी परिसरावर लक्ष

गिरगाव चौपाटी परिसरात उपलब्ध असलेल्या CCTV कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी डी विभागाकडून नियंत्रण कक्षात विशेष स्क्रीन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जनादरम्यान चौपाटी परिसरात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती तात्काळ मिळावी, यासाठी दोन ड्रोनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील परिस्थितीवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मुंबई अग्निशमन दल, पोलीस, आरोग्य विभाग, किनारी सुरक्षा यंत्रणा आणि इतर संबंधित विभागांशी नियंत्रण कक्षामार्फत तातडीने समन्वय साधून आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.

याबाबतची माहिती प्रमुख अधिकारी (आपत्ती व्यवस्थापन विभाग) श्रीमती रश्मी लोखंडे यांनी दिली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

२४ सप्टेंबर २०२६ रोजी डी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव मंडपाला आग लागणे, एखादी व्यक्ती समुद्रात बुडणे किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

विसर्जन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याने महानगरपालिकेने नागरी सुविधा, सुरक्षा, आरोग्य सेवा, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन व्यवस्थापन यांचा समन्वय साधला आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, CCTV, ड्रोन, हॅम रेडिओ आणि विविध शासकीय यंत्रणांमधील थेट समन्वयामुळे स्वराज्यभूमी परिसरातील परिस्थितीवर तत्काळ लक्ष ठेवून आवश्यक ती कार्यवाही करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.