लातूर पॅटर्न म्हणजे ‘मोटेगावकर’ नव्हे; शिक्षण परंपरेचा वारसा जपणाऱ्या लातूरकरांच्या भावना
नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या लातूर पॅटर्नबाबत लातूरकरांनी भावना व्यक्त केल्या आहेत. काही व्यक्तींच्या कथित गैरप्रकारांमुळे संपूर्ण लातूरच्या शैक्षणिक परंपरेला दोष देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. अनेक शिक्षकांच्या योगदानातून उभा राहिलेला लातूर पॅटर्न आजही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रतीक मानला जातो.
मराठवाडा ब्युरो | लक्ष्मण चौरे
लातूर : नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या "लातूर पॅटर्न" संदर्भात लातूरकरांकडून भावना व्यक्त केल्या जात आहेत. काही व्यक्ती अथवा खाजगी शिकवणी वर्गांशी संबंधित कथित गैरप्रकारांमुळे संपूर्ण लातूरच्या शैक्षणिक परंपरेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नसल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून मांडले जात आहे.
लातूर पॅटर्न हा कोणत्याही एका व्यक्तीचा, एका क्लासचा किंवा खाजगी शिकवणी संस्थेचा चेहरा नसून तो अनेक दशकांच्या शिस्तबद्ध शिक्षण, शिक्षकांचे समर्पण, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांच्या विश्वासातून घडलेली शैक्षणिक परंपरा असल्याचे सांगितले जात आहे.
नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात काही व्यक्तींची नावे चर्चेत आल्यानंतर "लातूर पॅटर्न" पुन्हा राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून सत्य तपासातून समोर येईलच; मात्र काही घटनांच्या आधारे संपूर्ण शिक्षण पद्धतीवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
लातूर पॅटर्नचा इतिहास
१९७० ते १९८० च्या दशकात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी काही ध्येयवादी शिक्षकांनी पुढाकार घेतला. सकारात्मक स्पर्धा, नियमित सराव, संभाव्य प्रश्नपत्रिकांचा अभ्यास, शिस्तबद्ध शिक्षण, वेळापत्रकानुसार अभ्यास आणि विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष या तत्त्वांवर शिक्षण पद्धती विकसित होत गेली.
यातून पुढे "लातूर पॅटर्न" आकाराला आला. १९८७ ते १९९५-९६ हा काळ या पद्धतीचा सुवर्णकाळ मानला जातो. सुरुवातीला "शाहू पॅटर्न" म्हणून ओळखली जाणारी ही शिक्षण प्रणाली पुढे राज्यासह देशभर चर्चेत आली.
दहावीच्या निकालांपासून सुरुवात झालेला हा पॅटर्न पुढे बारावी आणि स्पर्धा परीक्षांपर्यंत विस्तारला. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सातत्यपूर्ण निकालांमुळे लातूरने शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली.
शिक्षण क्षेत्रात बदललेले चित्र
गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणातील वाढती स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा, निकालांवर आधारित स्पर्धा आणि खाजगी शिकवणींचा वाढता प्रभाव यामुळे शिक्षण क्षेत्राचे स्वरूप बदलत गेले.
मोठ्या प्रमाणात विद्यार्थी खाजगी शिकवण्यांकडे वळले. यामुळे वसतिगृहे, मेस, कोचिंग उद्योग, जाहिरातबाजी आणि व्यावसायिक स्पर्धा वाढली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपेक्षा निकालांचे सादरीकरण आणि मार्केटिंगला महत्त्व मिळू लागल्याची टीका शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून केली जाते.
विद्यार्थ्यांवरील वाढता ताण
देशभरातील स्पर्धा परीक्षांमध्ये लाखो विद्यार्थी सहभागी होत असताना मर्यादित जागांसाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळे अनेक विद्यार्थी वारंवार परीक्षा देतात. त्यातून मानसिक ताण, नैराश्य आणि आर्थिक दबाव या समस्याही गंभीर होत असल्याचे चित्र आहे.
शिक्षण हे केवळ गुण, निकाल किंवा व्यवसाय नसून समाज घडवण्याचे माध्यम आहे. लातूर पॅटर्नची मूळ ओळख ही गुणवत्तापूर्ण शिक्षण, मेहनत, शिस्त आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन यामध्ये असल्याचे लातूरकरांकडून अधोरेखित केले जात आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1