कोकणातील कातळशिल्पांच्या वैज्ञानिक संवर्धनाला चालना; आयआयटीएम प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाउंडेशनसोबत सामंजस्य करार
कोकणातील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांच्या वैज्ञानिक अभ्यास, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धनासाठी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय आणि आयआयटीएम प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाउंडेशन, चेन्नई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमामुळे संशोधन, डिजिटल अभिलेख आणि वारसा संवर्धनाला नवे बळ मिळणार आहे.
मुंबई, दि. १६ : कोकणातील प्रागैतिहासिक कातळशिल्पांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय आणि आयआयटीएम प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाउंडेशन, चेन्नई यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून यामुळे कातळशिल्पांच्या वैज्ञानिक अभ्यासाला आणि डिजिटल संवर्धनाला गती मिळणार आहे.
मंत्रालयातील सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा करार झाला.
या करारामुळे कातळशिल्पांशी संबंधित संशोधन माहिती, डिजिटल अभिलेख, नकाशे, छायाचित्रे आणि तांत्रिक साधनसंपत्तीचा प्रभावी वापर होणार आहे. तसेच वारसा जतन आणि संवर्धनाच्या कामांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे.
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ८० गावांमध्ये सर्वेक्षण करून आतापर्यंत जवळपास २,००० कातळशिल्पांचा शोध लावला आहे. या कातळशिल्पांमध्ये हत्ती, एकशिंगी गेंडा, कासव, पाणघोडा, विविध पक्षी, मानवी आकृत्या आणि अनेक रहस्यमय चिन्हांचा समावेश आहे.
कोकणातील देवीहसोळ, कशेळी, रुंढे तळी, उक्षी, बारसू, जांभरूण, देवाचे गोठाणे, कुडोपी तसेच गोवा राज्यातील फंसाईमाळ या नऊ कातळशिल्प स्थळांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकनाच्या तात्पुरत्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
या सामंजस्य करारामुळे संशोधन अहवाल, नकाशे, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि अभिलेख यांचे परस्पर आदान-प्रदान सुलभ होणार आहे. तसेच प्रकल्पासाठी वापरलेली तांत्रिक उपकरणे आणि संशोधन साधने संचालनालयाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.
याशिवाय कातळशिल्पांवरील पुढील संशोधन, शैक्षणिक सहकार्य, संयुक्त प्रकाशने, ज्ञानप्रसार आणि क्षमता विकास कार्यक्रमांना चालना मिळणार असून कोकणातील अमूल्य सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी हा करार महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0