महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पत्रकारांची एकजूट; श्रीवर्धन पत्रकार संघाचा स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पत्रकारांची एकजूट. श्रीवर्धन पत्रकार संघाने एक लाख स्वाक्षरी मोहिमेला दिला पाठिंबा; सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणीची मागणी.

Apr 12, 2026 - 03:06
 0  5
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पत्रकारांची एकजूट; श्रीवर्धन पत्रकार संघाचा स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा
श्रीवर्धन पत्रकार संघाने एक लाख स्वाक्षरी मोहीम

रायगड | प्रतिनिधी उदय कळस :

दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर न्याय मिळावा यासाठी राज्यभरातील पत्रकार संघटना एकत्र येत असल्याचे चित्र दिसत आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर या चळवळीला अधिक गती मिळत आहे.

रायगड जिल्ह्यातील नोंदणीकृत श्रीवर्धन तालुका पत्रकार संघ (बोर्लीपंचतन) यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. संघाचे अध्यक्ष उदय कळस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष विजय कांबळे, पदाधिकारी मकरंद जाधव, गणेश प्रभाळे, मुजफ्फर अलवारे तसेच सदस्य मिलिंद जाधव, सर्फराज दर्जी, रमेश घरत यांनी एकमुखी भूमिका घेत एक लाख स्वाक्षरी मोहिमेला संपूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

सीमावाद प्रकरणावर लवकर सुनावणी व्हावी आणि निर्णय व्हावा यासाठी ही स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेद्वारे नवी दिल्लीतील भारताचे सर्वोच्च न्यायालय यांचे माननीय मुख्य न्यायाधीश यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे.

गेल्या सुमारे २२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे देशभरातील पत्रकारांचे लक्ष वेधले जात आहे. बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या मोहिमेची माहिती रायगड जिल्ह्यात पोहोचवण्यात माणगाव येथील पत्रकार नरेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या मोहिमेमुळे रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जनजागृती होत असून पत्रकारांनी मोठ्या संख्येने स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शविला आहे. मराठी अस्मिता आणि सीमाभागातील नागरिकांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्याला मिळणारा वाढता प्रतिसाद महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0