डोंबिवली रेल्वे मैदानावरील विकासकामाला स्थगिती; खेळाडूंना पुन्हा मिळणार का हक्काचे मैदान?

डोंबिवली पश्चिमेतील 52 चाळ परिसरातील रेल्वे मैदानावरील विकासकामाला रेल्वे प्रशासनाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. स्थानिक नागरिक, क्रिकेटपटू आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला. आता हे मैदान कायमस्वरूपी खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jun 3, 2026 - 00:59
Jun 3, 2026 - 02:32
 0  64
डोंबिवली रेल्वे मैदानावरील विकासकामाला स्थगिती; खेळाडूंना पुन्हा मिळणार का हक्काचे मैदान?
डोंबिवली रेल्वे मैदान, रेल्वे ग्राउंड बचाव आंदोलन,

मी मराठी लाईव्ह चीफ एडिटर | डायरेक्टर मनिषा गुरव- मोहिते 

डोंबिवली पश्चिमेतील 52 चाळ परिसरातील ऐतिहासिक रेल्वे ग्राउंडच्या विकासकामाला रेल्वे प्रशासनाने तात्पुरती स्थगिती दिली असून हे मैदान पुन्हा एकदा क्रिकेटपटू, मैदानी खेळाडू आणि क्रीडाप्रेमींसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र हे मैदान कायमस्वरूपी खेळाडूंच्या हक्काचे मैदान म्हणून उपलब्ध करून दिले जाईल का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

रेल्वे मैदानाच्या खाजगीकरण व व्यावसायिकरणाच्या प्रस्तावाविरोधात सर्वपक्षीय नेते, क्रिकेटपटू, क्रीडाप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत तीव्र आंदोलन उभारले होते. या आंदोलनाची दखल घेत रेल्वे विभागाला विकासकामाला स्थगिती देण्याचा निर्णय घ्यावा लागला.

अनेक नामांकित क्रिकेटपटूंची जडणघडण याच मैदानावर

डोंबिवलीकरांच्या क्रीडा संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले हे रेल्वे मैदान अनेक दशकांपासून क्रिकेट आणि इतर मैदानी खेळांचे प्रमुख केंद्र राहिले आहे. भारतीय क्रिकेटपटू  अजिंक्य रहाणे  तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू  निलेश कुलकर्णी  यांच्यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू याच मैदानावर घडले आहेत.

हे मैदान केवळ डोंबिवलीतील नव्हे तर परिसरातील हजारो नागरिकांसाठी आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक एकात्मतेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे विकासाच्या नावाखाली मैदानाचे व्यावसायिकरण होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

सर्वपक्षीय आंदोलनाला यश

रविवारी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात स्थानिक नागरिक, खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या आंदोलनाला खासदार  श्रीकांत शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण  तसेच आमदार राजेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी स्थानिक नगरसेविका रविना राहुल म्हात्रे, नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे, भाजप प्रवक्ते व नगरसेवक दीपेश म्हात्रे तसेच शिवसेना युवासेनेचे कल्याण-डोंबिवली सचिव राहुल म्हात्रे यांच्यासह रेल्वे ग्राउंड बचाव समितीचे कृष्णा कीर, सतीश म्हात्रे, पंकज चौधरी, डॅनी पीडितरा, दर्शन आडरकर, अजित म्हात्रे, प्रसाद सुर्वे, राजा जाधव, शशी वाडकर, कैलास आणि इतर कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

नागरिकांचे रेल्वे प्रशासनाला प्रश्न

स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हे मैदान काही वर्षांपूर्वी आगरी समाजाकडून 99 वर्षांच्या लीज करारावर घेण्यात आले होते आणि त्या कराराचा कालावधी अद्याप संपलेला नाही. अशा परिस्थितीत हे मैदान व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न का करण्यात आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

खेळाडूंना मैदानाचा काही भाग कायमस्वरूपी मिळणार?

विकासकामाला स्थगिती मिळाल्याने खेळाडूंमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी मैदानाचा काही भाग क्रिकेट आणि इतर मैदानी खेळांसाठी कायमस्वरूपी राखून ठेवला जाईल का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.

स्थानिक नागरिक, क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंची आता एकच मागणी आहे की, डोंबिवलीच्या क्रीडा परंपरेचे प्रतीक असलेले हे मैदान भविष्यातही खेळाडूंच्या सेवेत राहावे आणि त्याचे पूर्णपणे व्यावसायिकरण होऊ नये. रेल्वे प्रशासन या मागणीबाबत कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0