शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतन इमारतींसाठी निधीची कमतरता भासणार नाही - मंत्री चंद्रकांत दादा पाटील

कोल्हापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात सुमारे 330 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक इमारतींसाठी आवश्यक निधीची कोणतीही कमतरता भासणार नसल्याची ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली. यावेळी महाविद्यालयाच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला तसेच शासकीय तंत्रनिकेतनमध्ये उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

Jun 12, 2026 - 23:00
 0  5
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतन इमारतींसाठी निधीची कमतरता भासणार नाही - मंत्री चंद्रकांत दादा पाटील
चंद्रकांत पाटील, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर,

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : राज्य शासनाच्या सुधारीत मान्यतेनुसार सुमारे 330 कोटी रुपये खर्च करून कोल्हापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात विविध अत्याधुनिक इमारती उभारण्यात येत आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल आणि निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नेचर पार्क परिसरात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, उच्च तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, प्राचार्य कॅप्टन नितीन सोनजे, समन्वयक रणजीत सावंत, डॉ. किरण कोळेकर, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एच. डी. कट्टी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, नव्या इमारतींसाठी आवश्यक पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 4 कोटी रुपये आणि उच्च तंत्र शिक्षण विभागामार्फत 5 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या माध्यमातून महाविद्यालय परिसरात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सुविधा निर्माण केली जाईल.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी सुमारे साडेतीनशे प्राध्यापकांची भरती करण्यात आली असून या प्रक्रियेला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. तसेच कोल्हापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उत्कृष्ट असल्याचे निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदविले.

आढावा बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आलेल्या उत्कृष्टता केंद्राचे (Centre of Excellence) उद्घाटन करण्यात आले. राज्यातील तंत्रनिकेतन स्तरावर कोल्हापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये हे एकमेव उत्कृष्टता केंद्र उभारण्यात आले आहे.

या केंद्रासाठी राज्य शासनाने अत्याधुनिक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि प्रशिक्षण सुविधांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत तीन अत्याधुनिक प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे.

यावेळी महापालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतनचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0